सामाजिक भान विसरल्या लग्नवराती
By Admin | Updated: May 10, 2017 00:27 IST2017-05-10T00:27:40+5:302017-05-10T00:27:40+5:30
सगळीकडे लग्नाचा धुमधडाका सुरू आहे. मात्र मंगल कार्यालयाच्या वाटेने जाणाऱ्या लग्नवराती सामाजिक भान हरवून बसल्या की काय,

सामाजिक भान विसरल्या लग्नवराती
मुहूर्ताला मुठमाती : वऱ्हाडी डीजेवर नाचण्यात दंग, ध्वनी प्रदूषणात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : सगळीकडे लग्नाचा धुमधडाका सुरू आहे. मात्र मंगल कार्यालयाच्या वाटेने जाणाऱ्या लग्नवराती सामाजिक भान हरवून बसल्या की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. वरातीमधील धांगडधिंगा, कानठळ्या बसविणारे डीजे व लग्नाचे मुहूर्त यांना सामाजिक बंधनेच उरली नाही काय, असे वाटायला लागले आहे.
लग्नसोहळा हा जीवनातील आनंदाचा प्रसंग आहे. त्याप्रसंगी आनंदोत्सव साजरा करणे क्रमप्राप्तही आहे. मात्र आपल्या आनंदामुळे दुसऱ्याचा आनंद हिरावला जाऊ नये, याचे भान ठेवणेही प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. लग्नवरातीतील सनईचे मंगल सूर तर आता लुप्तच झाले आहेत. तालासुरात निनाद करणारे बँन्डही आता कालबाह्य ठरत आहे. त्याची जागा वाहनावर बांधलेले डीजे, भोंगे यांनी घेतली आहे. डीजेचे कर्कश आवाज आजुबाजूच्या लोकांच्या कानठळ्या बसवित आहेत. ध्वनी प्रदूषणाचा नियम तोडून हा गगनभेदी आवाज साऱ्यांनाच त्रासून सोडत आहे. डीजेच्या तालावर थिरकणारे वऱ्हाडी उन्हातान्हाची पर्वा न करता घाम गाळत असतात.
रस्त्यावर नाचण्यामध्ये आता महिला व तरूणींनी तरूणांनाही मागे टाकल्याचे चित्र रस्तोरस्ती पाहायला मिळत आहे. वरातीच्या या गोंधळामुळे रस्ते बंद होऊन वाहतुकीचा खोळंबा होतो, याचे भानही वरपक्षाला राहत नाही. वरातीच्या मागे वाहनांच्या रांगा लागतात, हे कोणालाही दिसत नाही. तर डिजेचा आवाज व वाहतुकीचा खोळंबा यावर निर्बंध घालण्याची सामाजिक जबाबदारी पोलीसही विसरून गेले आहेत.
नाचगाण्याच्या गुंगीत असणाऱ्या वरपक्षाला लग्नमुहूर्ताचेही भान राहत नाही. घटी मुहूर्ताचे लग्न गोरज मुहूर्तावर लागण्याचे प्रकारही घडत आहे. वधुपक्षाकडील वऱ्हाडी वरपक्षाची प्रतीक्षा करून थकून जातात. त्यांनी तयार केलेली जेवनाची मेजवाणी थंड होऊन जाते. मात्र वधु पक्षाला तोंडही उघडायची उजागरी नसते.
लग्नपत्रिकेवर असलेली लग्नवेळ ही पत्रिकेपुरतीच मर्यादीत राहते. बरीचशी लग्न दुपारी २ वाजतानंतरच लावली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वधू पक्षाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. मुलीकडील बाजू असल्यामुळे नवरदेवाकडील मंडळीला काही बोलणेही टाळले जाते. लग्नपत्रिकेतील वेळेवर लग्न लावणाऱ्यांना बक्षिस द्यायचे ठरविले, तर स्पर्धकही मिळेल की नाही, अशी स्थिती आज निर्माण झाली आहे.
‘झिंगाट’चे भूत अद्यापही मानगुटीवर
लग्नसराईत दरवर्षी कुण्यातरी एका गाण्याची क्रेझ असते. यंदाही ती आहे. सैराटमधील झिंग झिंग झिंगाट या गाण्याचे भूत अद्यापही मानगुटीवरून उतरले नाही. प्रत्येक वरातीत डिजेवर हे गाणे वाजविण्याचा वऱ्हाड्यांचा आग्रह असतो. त्यावर केवळ तरूणच नाही तर महिला आणि युवतीही ताल धरताना दिसून येत आहे.