ओलित करायचेयं, मग रात्रभर थंडीत जागा
By Admin | Updated: November 3, 2015 03:01 IST2015-11-03T03:01:08+5:302015-11-03T03:01:08+5:30
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी ओलितासाठी जीवाचे रान करीत असताना आता वीज वितरण कंपनीने मध्यरात्रीनंतर

ओलित करायचेयं, मग रात्रभर थंडीत जागा
मध्यरात्रीनंतर करणार वीज पुरवठा : महावितरण कंपनीने ऐन हिवाळ्यात कृषिपंपाचे वेळापत्रक बदलविल्याने संताप
यवतमाळ : दुष्काळी परिस्थितीत शेतकरी ओलितासाठी जीवाचे रान करीत असताना आता वीज वितरण कंपनीने मध्यरात्रीनंतर वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ओलित करायचे असेल तर शेतकऱ्यांना रात्रभर कडाक्याच्या थंडीत जागावे लागणार आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.
हंगाम बदलताच सवयीप्रमाणे वीज वितरण कंपनीने कृषिपंपाच्या भारनियम वेळापत्रक बदल केला. सिंचनासाठी रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत वीज पुरवठा देण्याचे नियोजन केले आहे. शेतकरी सातत्याने नैसर्गिक आपत्ती आणि नापिकीला तोंड देत कसेबसे उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातही यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून कुप्रसिद्ध आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या कारणांची अनेक घटकांकडून कारणमीमांसा केली जात आहे. त्याने आत्महत्या करु नये यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचे बळीराजा चेतना अभियान हाती घेतले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्याने रबीच्या पिकांची लागवडच करु नये अशी सोय जाणीवपूर्वक केली आहे. वीज कंपनी सातत्यानेच शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. उन्हाळ्यात भरदुपारी सिंचनासाठी वीज पुरवली जाते. तर नोव्हेंबर-डिसेंबरच्या थंडीत मध्यरात्री शेतकऱ्याला उघड्या माळरानावर सिंचनासाठी जाण्यासाठी मजबूर केले जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपले मानसिक स्वस्थ्य कसे कायम ठेवायचे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. हीच यंत्रणा शेतकऱ्याला मनोरुग्ण ठरविण्यासाठीही पुढे आली आहे. तथाकथितांनी उपचाराचा आणि जागराचा बाजार मांडला असून प्रत्यक्षात येत असलेल्या अडचणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
मदतीच्या नावाखाली स्वत:चे दातृत्व मिरवणाऱ्या संस्था आणि अधिकारी-पुढाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे सर्व करताना शेती आणि शेतकऱ्यांपुढे येणाऱ्या अडचणी याच्या वास्तावापासून सर्वच जण जाणीवपूर्वक स्वत:ला दूर ठेवत असल्याचे दिसून येते. यंदाच्या रबी हंगामात शेतकरी उघड्या माळरानावर कुडकुडणार हे पक्के झाले आहे. सरकार बदलले मात्र कामाची पद्धत व खाक्या तोच आहे. अशा परिस्थितीत आपण कुणाकडे दाद मागावी, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. शेतीचा मुद्दा आला की, कृषीपंपाचे थकित वीजबिल, विजेचा तुटवडा, वीज वितरण कंपनीची दिवाळखोरी, बिघाड अशा अनेक सबबी पुढे करण्याचा सपाटा सुरू केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
६० मेगावॉट विजेचा तुटवडा असल्याने सिंचन करणे शक्य नव्हते. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विज कंपनीच्या संचालक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांना यवतमाळात पाचारण करुन या समस्येवर उपाय काढण्यास सांगितले. त्यांनी टंचाईच्या काळात कृषिपंपांना वीज पुरवठा देण्यासाठी नवीन शेड्यूल तयार केले आहे. मात्र थंडीचा प्रकोप बघता शेतकऱ्यांना ते सोयीचे ठरणारे नाही. यात लवकरच बदल केला जावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
- संजय राठोड, पालकमंत्री, यवतमाळ