आदिवासी आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांना सर्पदंश
By Admin | Updated: August 15, 2015 02:26 IST2015-08-15T02:26:29+5:302015-08-15T02:26:29+5:30
आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात जमिनीवर गादी टाकून झोपलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना विषारी सापाने दंश केला.

आदिवासी आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांना सर्पदंश
प्रकृती गंभीर : वाघोली येथील मध्यरात्रीची घटना
पांढरकवडा : आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात जमिनीवर गादी टाकून झोपलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना विषारी सापाने दंश केला. ही घटना तालुक्यातील वाघोली येथील देवराव गेडाम आदिवासी आश्रमशाळेत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दोघांचीही प्रकृती गंभीर असून यवतमाळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अनिकेत भीमराव पेंदोर (१५) रा. दातपाडी आणि सुखदेव विश्वनाथ गेडाम (१४) रा. वसंतनगर ता. पांढरकवडा अशी सर्पदंश झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहे. अनिकेत हा नवव्या वर्गाचा तर सुखदेव आठव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. आश्रमशाळेच्या वसतिगृहातील एका खोलीत १२ विद्यार्थी जमिनीवर गाद्या टाकून झोपले होते. गुरुवारी रात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास अनिकेत व सुखदेव हे दोनही विद्यार्थी किंचाळून उठले. त्यांच्या हाताला सापाने दंश केल्याचे त्यांनी प्रत्यक्ष बघितले. या प्रकाराने घाबरुन जाऊन विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. अधीक्षक एन.एल. वानखडे तत्काळ वसतिगृहात पोहोचले.
सर्पदंश झालेल्या दोघांना तातडीने पांढरकवडाच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचार करून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांंना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
याबाबत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक महेंद्र केळझरकर व अधीक्षक वानखडे यांच्याशी संपर्क साधला असता विद्यार्थी रात्री लघुशंकेसाठी उठतात. खोलीचे दार न लावताच तसेच झोपतात. आश्रमशाळेच्या बाजूला शेती असून या शेतातून एखाद्या सापाने खोलीत प्रवेश केला असावा, असे सांगितले. आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डी.व्ही. डाखोरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)
वसतिगृहाच्या दाराला फटी
पांढरकवडापासून १२ किलोमीटर अंतरावर वाघोली येथे देवराव गेडाम आश्रमशाळा आहे. पहिली ते दहावीचे ३७९ विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे राहतात. मुली व मुलांचे स्वतंत्र निवासस्थान आहे. परंतु या शाळेला लागूनच शेती आहे. आजूबाजूला अस्वच्छता आहे. विद्यार्थी ज्या खोलीत झोपतात त्या खोलीच्या दाराला फटी असून या फटीतूनच सापाने खोलीत प्रवेश केला असावा असा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना सर्पदंश झाल्यानंतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निवासासंदर्भात कडक निर्देश दिले होते. परंतु याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. परिणामी दोन आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची घटना घडली.