कोसारा (सावंगी) घाटातून रेतीची तस्करी
By Admin | Updated: December 4, 2014 23:16 IST2014-12-04T23:16:29+5:302014-12-04T23:16:29+5:30
तालुक्याला लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या वर्धा नदी पात्रातील कोसारा (सावंगी) रेती घाटातून रात्रंदिवस खुलेआम रेती तस्करी सुरू आहे. मात्र महसूल प्रशासन अद्याप निद्रीस्थ असल्याचे दिसून येते़

कोसारा (सावंगी) घाटातून रेतीची तस्करी
मारेगाव : तालुक्याला लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या वर्धा नदी पात्रातील कोसारा (सावंगी) रेती घाटातून रात्रंदिवस खुलेआम रेती तस्करी सुरू आहे. मात्र महसूल प्रशासन अद्याप निद्रीस्थ असल्याचे दिसून येते़
यावर्षी तालुक्यातील रेती घाटांचा अद्याप लिलाव झाला नाही़ त्यातच तहसीलदार, नायब तहसीलदारांना तालुक्यातील गौण खनिज, अवैध उत्खनन व रेती तस्करीकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. परिणामी रेती माफिया चांगलेच सक्रिय झाले आहे़ चोरून आणलेली रेती चढ्या भावाने विकायचा, अनेकांचा व्यवसाय झाला आहे़ रेती माफियांनी गावागावात ठिकठिकाणी रेतीचे साठे करून ठेवले आहेत़ तसेच नरसाळा येथील ‘ई’ क्लास जमिनीवर करणवाडी ते वडकी रस्त्यालगत व मिळेल त्या ठिकाणाहून विना रायल्टीने शेकडो ब्रास मुरूमाची चोरी होत आहे.
गौण खनिजाची लूट सुरू असल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे़ या गौण खनिज माफियांना तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदारांचा वरदहस्त असावा, असा आरोप केला जात आहे़ कोसारा रेती घाट मारेगाव तालुक्यात येतो. मात्र या घाटावर जाणारा काही रस्ता राळेगाव तालुक्यातून जातो़ त्यामुळे मारेगाव तहसील प्रशासनाचे या घाटाकडे लक्ष नाही. त्यामुळे दररोज रेतीची चोरी होते.
ही बाब लक्षात घेऊन राळेगावच्या तहसीलदारांनी या आठवड्यात महसूल मिळवण्यासाठी कोसारा घाटातून रेतीची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर खैरी येथे अडविले. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करून सर्व वाहने वडकी पोलिसांच्या दिली.
राळेगाव तहसीलदारांच्या या कारवाईने रेती माफियात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांचे धाबे दणाणले आहे. कारवाई झालेले ट्रॅक्टर चालक धंदेवाईक नसल्याने ते शांत बसतील़ मात्र सराईत व्यावसायीक व रेती माफिया आपल्या अवैध कृत्यापासून परावृत्त होणार नाही़ राळेगाव तहसीलदारांनी केलेल्या कारवाईने येथील महसूल प्रशासनाची चांगलीच नाचक्की झाली आहे.
वास्तविक कोसारा गावासाठी स्वतंत्र तलाठी असताना, या रेती घाटावरून रेतीची चोरी होत आहे. हा प्रकार मारेगाव तहसीलदारांना कळू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता तरी येथील महसूल प्रशासनाने सावध होऊन कोसारा घाटातील रेती तस्करी थांबविण्यासाठी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)