कामठीतून होते जनावरांची तस्करी
By Admin | Updated: March 3, 2017 02:02 IST2017-03-03T02:02:43+5:302017-03-03T02:02:43+5:30
बंदी असतानाही विदर्भातून मोठ्या प्रमाणावर आंध्रप्रदेशात जनावरांची तस्करी केली जात आहे.

कामठीतून होते जनावरांची तस्करी
व्हाया वणी : एक वर्षात जनावरांसह ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
वणी : बंदी असतानाही विदर्भातून मोठ्या प्रमाणावर आंध्रप्रदेशात जनावरांची तस्करी केली जात आहे. या तस्करीसाठी तस्करांना व्हाया वणी मार्गे आंध्रात पोहचणे सोईचे जात असल्याने याच मार्गाने मोठ्या प्रमाणावर जनावरांची तस्करी केली जात आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी केलेल्या कारवायांमधून ही बाब पुढे आली आहे.
महाराष्ट्रात जनावरांची कत्तल व मांस विक्रीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी विदर्भातून मोठ्या प्रमाणावर आंध्रप्रदेशात जनावरांची तस्करी केली जात आहे. ही जनावरे हैद्राबाद येथे नेऊन त्यांची कत्तल केली जाते व मांस इतरत्र नेऊन विकले जात असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. या तस्करीचे तार नागपुरातील कामठी भागात जुळले असून जमा केलेली जनावरे तेथून वाहनात कोंबून हैैद्राबाद येथे नेले जात आहे. त्यासाठी जाममार्गे पुढे हैैद्राबाद हायवेने ही जनावरे नेली जातात. किंवा ज्या मार्गाने लहान पोलीस ठाणी आहेत, त्या मार्गे जनावरांची तस्करी केली जात आहे. यासाठी तस्करांना वणी मार्ग सोईचा असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी या तस्करीवर वणी पोलिसांची करडी नजर असून गेल्या वर्षभरात केलेल्या विविध कारवायांमधून पोलिसांनी ५० लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सन २०१६-१७ मध्ये वणी पोलिसांनी जनावरांच्या तस्करीच्या विषयात एकूण १० कारवाया केल्यात. त्यात १६६ जनावरांसह तस्करीसाठी वापरण्यात आलेले ट्रक, मिनी ट्रक आदी वाहने जप्त करण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)