तस्करीने वनखाते हादरले

By Admin | Updated: September 24, 2014 23:42 IST2014-09-24T23:42:37+5:302014-09-24T23:42:37+5:30

पुसद वनविभागांतर्गत सुरू असलेल्या सागवान तस्करीने वन खात्यातील तमाम अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. तस्करांपुढे वन प्रशासनाने हात टेकविले आहे.

Smuggled forests shook | तस्करीने वनखाते हादरले

तस्करीने वनखाते हादरले

पुसद : पुसद वनविभागांतर्गत सुरू असलेल्या सागवान तस्करीने वन खात्यातील तमाम अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. तस्करांपुढे वन प्रशासनाने हात टेकविले आहे. अखेर यातून मार्ग काढण्यासाठी मंगळवारी विदर्भ- तेलंगाणा-मराठवाडा सीमावर्ती क्षेत्र अधिकाऱ्यांची मेगा बैठक पार पडली.
पुसद वनविभागांतर्गत उपवनसंरक्षक एस.व्ही. आलुरवार यांच्या नेतृत्वात वन खात्याची यंत्रणा काम करते. परंतु सध्या आलुरवार आणि कंपनीच्या नियंत्रणाबाहेर वन विभागाचा कारभार गेला आहे. पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या सर्वच तालुक्यांमध्ये सागवान तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एखाद दोन प्रकरणात ही तस्करी उघड होत असली तरी त्यात वन खात्याचे फार श्रम नाहीत. नियोजन चुकल्याने, वाहन फसल्याने, वाहन बंद पडल्याने, तांत्रिक अडचण आल्याने या तस्करांचा पर्दाफाश झाला. वन खात्याच्याच मूक संमतीने व हलगर्जीपणामुळे अवैध वृक्ष तोड वाढली आहे.
वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी तालुका मुख्यालयी राहून अजब पद्धतीने जंगल संरक्षण करीत असल्याने तस्करांना रान मोकळे झाले आहे. वन यंत्रणा सायंकाळनंतर जंगलात येतच नाही, याची खात्री पटल्याने तस्कर पहाटेपर्यंत जंगलाचा ताबा घेतात. विशिष्ट यंत्राद्वारे मोठमोठ्या वृक्षांची तोड करून सागवान सिमापार नेले जात आहे.
या सागवान तस्करीने वन खात्याची यंत्रणा चांगलीच हादरली आहे.
या पार्श्वभूमीवर पुसदचे डीएफओ आलुरवार, आदिलाबादचे वनसंरक्षक डॉ. शेखर रेड्डी यांच्या नेतृत्वात विदर्भ-तेलंगाणा-मराठवाड्याच्या सीमेवरील गावात मंगळवारी बैठक घेण्यात आली. त्यात तीनही प्रांतातील सहायक वनसंरक्षक, वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल उपस्थित होते.
पुसद विभागातील जंगलांमध्ये मराठवाड्यातील तस्कर आढळून आले आहे. या तस्करांना पायबंद कसा करायचा यावर बैठकीत चिंतन करण्यात आले. विदर्भात सागवान तोड करून चोरट्या मार्गाने अथवा नदीच्या आश्रयाने लाकूड मराठवाड्यात, तेलंगाणात नेले जाते. त्याला प्रतिबंध घालण्याचे बैठकीत ठरले. वनसंरक्षणासाठी ही बैठक घेतली गेल्याचे पुसदचे डीएफओ सुरेश आलुरवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Smuggled forests shook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.