छोटे व्यावसायिकही आता सावकारांच्या जाळ्यात
By Admin | Updated: March 11, 2015 01:57 IST2015-03-11T01:57:48+5:302015-03-11T01:57:48+5:30
तालुक्यात सध्या अवैध सावकारांनी सुशिक्षित बेरोजगार व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आपले लक्ष्य केले असून त्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू केली आहे.

छोटे व्यावसायिकही आता सावकारांच्या जाळ्यात
उमरखेड : तालुक्यात सध्या अवैध सावकारांनी सुशिक्षित बेरोजगार व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आपले लक्ष्य केले असून त्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू केली आहे. याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने अवैध सावकारीचा व्यवसाय चांगलाच भरभराटीस आल्याचे दिसून येते.
तालुक्यातील ढाणकी, मुळावा, पोफाळी, विडूळ, बिटरगाव, दराटी, ब्राह्मणगाव आणि उमरखेड शहर या ठिकाणी छोट्या व्यवसायासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतलेले व्यावसायिक आता सावकारांच्या मगरमिठीत सापडले आहे. फायनान्सच्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगार व छोट्या व्यावसायिकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज पुरवठा करून त्याची लूट सर्रास सावकारांकडून होत आहे. त्यामुळे छोटे व्यावसायिक त्रस्त आहे. शिक्षण घेवून नोकऱ्या मिळत नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरी शोधण्यापेक्षा आपला मोर्चा छोट्या व्यवसायांकडे वळविला आहे. परंतु राष्ट्रीय बँका कर्ज मंजूर करीत नाही. विविध महामंडळे केवळ नावापुरतीच आहे. त्यामुळे नाईलाजास्तव हे बेरोजगार खासगी सावकारांकडे जातात व त्यांच्या या लाचारीचा पुरेपूर फायदा सावकार मंडळी उचलतात.
अंगावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे सध्या छोटे व्यावसायिक डबघाईस आले आहे. व्यवसाय वाढीच्या आशेने त्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड करणे तर दूरच व्याजातच त्यांचा सुरू असलेला व्यवसायसुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. फायनान्स या गोंडस नावाखाली छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे शोषण या अवैध व्यावसायिकांनी सुरू केले आहे. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे. स्पर्धेच्या युगात उच्च तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळे कुठलीही खासगी किंवा शासकीय नोकरी उपलब्ध होण्याची कोणतीही शक्यता नसते. तसेच कोणत्याही प्रकारचे लागेबांधे व पैसा गाठीशी नसल्याने संस्था अथवा अशा तत्सम ठिकाणी नोकरी मिळणे अतिशय जिकिरीचे काम असते. त्यामुळेच उच्चशिक्षित तरुणही चहा टपरी, पानठेला, फळ विक्री, हॉटेल, प्रवासी वाहतूक आदी व्यवसाय करू लागले आहे. परंतु अनुभव नसल्यामुळे आणि अंगावर कर्ज असल्यामुळे त्यांना या व्यवसायात आवश्यक परतावा मिळत नाही.
परंतु सावकार मात्र व्याजावर व्याज लावतच राहतो. दहा हजार रुपये कर्ज घेतल्यास पहिला हप्ता म्हणून व्याजाचे दीड हजार रुपये कापून साडेआठ हजार रुपये गरजूच्या हातावर टिकविले जाते. त्यानंतर प्रतिदिन अथवा प्रतिमाह वसूली सुरू होते. सावकाराची माणसे वसुलीसाठी येतात. त्यांना निमुटपणे व्याजाचा हप्ता न दिल्यास ते धमकावतातसुद्धा अन्यथा आधीच घेतलेले बँकेचे धनादेश बँकेत टाकण्याची धमकी देतात.
तसेच सावकाराकडे गहाण असलेल्या वस्तू विकण्याचीही धमकी देतात. प्रसंगी विकूनही टाकतात. त्यामुळे नाईलाजास्तव काहीही करून व्याजाचा हप्ता तयार ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो.
(शहर प्रतिनिधी)