छोटे व्यावसायिक अवैध सावकारांच्या कचाट्यात
By Admin | Updated: November 26, 2014 23:14 IST2014-11-26T23:14:52+5:302014-11-26T23:14:52+5:30
छोट्या व्यवसायासाठी खासगी सावकारांकडून कर्ज घेतलेले व्यावसायीक आता सावकारांच्या मगरमिठीत सापडले आहे. आता फायनान्सच्या नावाखाली छोट्या व्यावसायिकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज पुरवठा

छोटे व्यावसायिक अवैध सावकारांच्या कचाट्यात
उमरखेड : छोट्या व्यवसायासाठी खासगी सावकारांकडून कर्ज घेतलेले व्यावसायीक आता सावकारांच्या मगरमिठीत सापडले आहे. आता फायनान्सच्या नावाखाली छोट्या व्यावसायिकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज पुरवठा करून त्यांची लूट सर्रासपणे सावकारांनी सुरू केली आहे.
अंगावर कर्जाच्या बोझ्यामुळे छोटे व्यावसायिक डबघाईस आले आहे. व्यवसाय वाढीच्या आशेने त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड करणे तर दूरच व्याजातच त्यांचा सुरू असलेला व्यवसायसुद्धा डबघाईस आला आहे. फायनान्स या गोंडस नावाखाली छोट्यामोठ्या व्यावसायिकांचे काही सावकारांनी अशाप्रकारे लूट चालविली आहे.
याकडे प्रशासनाचे मात्र पूर्णपण दुर्लक्ष आहे. त्यामुळे अवैध सावकारांचे चांगलेच फावत आहे. स्पर्धेच्या युगात उच्च तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळे कुठलीही खासगी किंवा शासकीय नोकरी उपलब्ध होण्याची कोणतीही शक्यता नसल्यामुळे अनेक बेरोजगारांनी छोटेमोठे उद्योग सुरू केले आहे. यामध्ये पानटपरी, चहा टपरी, फळ विक्री, हॉटेल, खानावळ आदी व्यावसायिकांचा समावेश आहे. सुरूवातीला व्यवसाय सुरू करण्यासाठी सावकारांकडून पैसे घेतले.
परंतु अनुभव नसल्यामुळे अशा व्यवसायामध्ये त्यांना नुकसान सहन करावे लागले. आणि पुन्हा सावकाराच्या दारात जावे लागले. व्यवसायाला उभारणी मिळेल या हेतुने पुन्हा त्यांनी कर्ज घेतले. परंतु आता कर्जाचे व्याज देण्यातच त्यांचा व्यवसाय डबघाईस आला आहे. त्यांच्या अगतिकतेचा फायदा सावकार उचलत आहे.
१० हजार रुपये कर्ज देतो असे सांगून सावकार सदर व्यावसायिकांकडून प्रथम हप्त्याचे व्याजाचे दीड हजार रुपये आधीच कापून साडे आठ हजार रुपये गरजूच्या हातावर टिकवितात.
व्यवसाय सुरू झाल्यानंतर प्रतिदिन अथवा प्रतिमाह वसुली सुरू होते. सावकाराची माणसे हप्तेवारीने व्यावसायिकांकडून पैसे वसूल करतात. हप्तेवारीच्या तगाद्याने व्यावसायिकाची मानसिकताच बिघडून जाते.
कर्जाच्या दृष्टचक्रात सापडलेला व्यावसायी मुदत पूर्ण होण्याआधीच परत कर्जाची मागणी करतात. अशावेळी सावकार आधीचे
थकलेले कर्ज वसूल करतो. पुन्हा व्याजाचे पैसे कापून व्यावसायिकाच्या हातात पैसे टिकवितो, असे हे चक्र सुरूच राहते.
१० हजारांपासून १० लाखांपर्यंत अशा तऱ्हेचा कर्ज पुरवठा करणाऱ्या अनेक सावकारांचे परिसरात पेव फुटले आहे. अशा सावकारांच्या कृत्याकडे पोलीस प्रशासन डोळेझाक करीत आहे. सावकारांविरुद्ध आवाज उठविण्याची हिम्मत छोटे व्यावायिकसुद्धा गमावून बसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)