दारू दुकान हटविण्यासाठी सावळीत महिला आक्रमक
By Admin | Updated: August 20, 2014 23:49 IST2014-08-20T23:49:00+5:302014-08-20T23:49:00+5:30
आर्णी तालुक्यातील सावळीसदोबा येथे सुरू असलेल्या देशी दारू दुकानामुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे अतिक्रमणातील दारू दुकान तत्काळ हटवावे, या

दारू दुकान हटविण्यासाठी सावळीत महिला आक्रमक
सावळीसदोबा : आर्णी तालुक्यातील सावळीसदोबा येथे सुरू असलेल्या देशी दारू दुकानामुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे अतिक्रमणातील दारू दुकान तत्काळ हटवावे, या मागणीला घेवून महिला आक्रमक झाल्या आहे. त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायत सदस्यांनीही यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.
येथील आठवडी बाजारात असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे प्रामुख्याने महिला वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे. सदर दुकान ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. वर्दळीच्या भागात असलेल्या दारू दुकानामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दारू ढोसून गोंधळ घालणाऱ्यांमुळे महिलांना रस्त्यातून ये-जा करणेही कठीण होवून बसले आहे. दारूड्यांचे अश्लील शब्दप्रयोग आणि हातवाऱ्यांमुळे महिलांची कुचंबना होत आहे. सहज उपलब्ध होत असलेल्या दारूमुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. युवा पिढीही दारूच्या आहारी जात आहे. या समस्या ग्रामपंचायत सदस्य आणि महिलांनी तालुका ते जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे वारंवार मांडल्या. प्रत्यक्ष चर्चाही करण्यात आली. परंतु यावर कुठलाही उपाय काढण्यात आला नाही. त्यामुळे २२ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. ग्रामपंचायत सदस्य मारेकाबाई तुकाराम शिंदे, बेबी उकंडराव दरोडे, गंगुबाई परशराम गुंजकर, इंदिराबाई सटवा शिंदे यांनी हा इशारा दिला आहे. यावर प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)