शेकडो सागवान वृक्षांची कत्तल ७८ नगांमध्ये दडपली
By Admin | Updated: December 27, 2014 02:37 IST2014-12-27T02:37:50+5:302014-12-27T02:37:50+5:30
जोडमोहा वनपरिक्षेत्रातील मार्तंडा आणि पहूर बीटमधील राखीव वनातील शेकडो परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करी झाली.

शेकडो सागवान वृक्षांची कत्तल ७८ नगांमध्ये दडपली
यवतमाळ : जोडमोहा वनपरिक्षेत्रातील मार्तंडा आणि पहूर बीटमधील राखीव वनातील शेकडो परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करी झाली. मात्र कारवाईचा पाश सैल करण्यासाठी वनविभागाने केवळ ७८ सागवान वृक्षांची कत्तल दर्शविली. तसेच घटनास्थळी तस्कर सोडून गेलेले निकृष्ट लाकूड जप्तीत दाखवून बनवाबनवी करण्यात आली. त्यामुळे सागवान तस्करीचे हे गंभीर प्रकरण एक प्रकारे दडपल्याच गेले. विशेष असे की, वनविभागाने ७८ वृक्षांची कत्तल दर्शवून आजतागायत कुणालाच आरोपी बनविले नाही. शिवाय वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना दोषी धरून कारवाईही केली नाही.
मार्तंडा आणि पहूर बीटमध्ये शेकडो परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करांनी अक्षरश: जंगलांची चाळणी केली. तसेच परिपक्व आणि सकस लाकडाची तस्करी करून निकृष्ट व अनावश्यक लाकूड घटनास्थळी टाकून दिले. हा गंभीर प्रकार लोकमतने उघडकीस आणला. त्यानंतर उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांनी या गंभीर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तेव्हा संबंधित सहाय्यक उपवनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चार -दोन कर्मचाऱ्यांना जंगलात गस्तीसाठी पाठवून केवळ खानापूर्ती केली. त्यानंतर सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी झाली नसल्याचा खोटा अहवालही डीएफओ लाकरा यांच्याकडे सादर करण्यात आला. अखेर डीएफओ लाकरा यांना घटनास्थळ दाखवून या तस्करीला लोकमतनेच वाचा फोडली. त्यानंतर मात्र डीएफओंची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळूच घसरली होती.
कारवाईचा बडगा नको म्हणून सावध पवित्रा घेत त्यांनी शेकडो सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी केवळ ७८ नगांमध्ये दडपली. मार्तंडा येथे ३५ तर पहूर बीटमध्ये ४३ सागवान वृक्षांची कत्तल झाल्याचे रेकार्ड तयार करण्यात आले. तत्पूर्वीही ही जुनीच तोड असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी थुटांवर फुटवे तयार झाल्याचे कारण देण्यात आले. वास्तविक वनविभागाच्या चौकशीत या फुटव्यांना कुठलाही पुरावा म्हणून अथवा बचावाचे साधन म्हणून स्थान नाही.
वनविभागाने तोड आणि तस्करी या दोन्ही गोष्टी मान्य केल्या असल्या तरी कुणालाही जबाबदार धरले नाही. त्यामुळेच तस्कर हुडकूण काढण्याची तसदीही घेतली गेली नाही. एकूणच वनविभागाने प्रकरण दडपण्यासाठी ही सारवासारवी केल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळावर तस्करांनी सोडलेला निकृष्ट लाकडांचा साठा जप्त करून कारवाईचा पाश सैल करण्यासाठी ही बनवाबनवी केल्याचेही स्पष्ट झाले. (स्थानिक प्रतिनिधी)