सहा तास सलग वीज कागदावरच
By Admin | Updated: November 11, 2015 01:45 IST2015-11-11T01:45:25+5:302015-11-11T01:45:25+5:30
शेतकऱ्यांना सलग सहा तासांची वीज देण्याचे आश्वासन वीज कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिले.

सहा तास सलग वीज कागदावरच
जनतेत रोष : झिरो लोडशेडिंगच्या नावाखाली वीज गुल
यवतमाळ : शेतकऱ्यांना सलग सहा तासांची वीज देण्याचे आश्वासन वीज कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिले. त्याच्या अंमलबजावणीसाठी कृषिपंपावर १६ तासांऐवजी १८ तासांचे भारनियमन लादण्यात आले. प्रत्यक्षात सलग वीज पुरवठा झालाच नाही. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. झिरो लोडशेडींगच्या नावाखाली सहा तासांमध्ये चार तास वीज गुल होत आहे. यामुळे रब्बी अखेरपर्यंत पोहोचणार किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वीज वितरण कंपनीने कृषिपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र फिडर कार्यान्वीत केले. यावरून वीज पुरवठा करण्यात येतो. पूर्वी आठ तास वीज दिली जात होती. मात्र ती कागदावरच होती. या आठ तासात वारंवार वीज खंडीत होत होती. यामुळे दिवसभरात दोन तास वीज मिळणेही कठीण होते.
यावर मात करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि वीज वितरण कंपनीच्या मुंबईच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये आठ तासाऐवजी सलग सहा तास वीज देण्याचे आश्वासन वीज कंपनीने जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार वीज कंपनीने वेळापत्रकही जाहीर केले.
यामध्ये तीन दिवस मध्यरात्री १२ ते ६ पर्यंत, तर पुढील तीन दिवस पहाटे ६ ते दुपारी १२ पर्यंत वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिवसा वीज पुरवठा करताना ६ तासांमध्ये ४ तास वीज गायब राहीली. पूर्वीप्रमाणे दोन तासही वीज मिळत नाही.
वेळापत्रक बदलविल्यानंतरही कृषिपंपावरील विजेचा प्रश्न सुटला नाही. तो जसाच्या तसाच आहे. उलट शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढविल्या आहे. यामुळे ओलित करायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे रब्बीचे उद्दिष्ट पूर्ण होणार किंवा नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी सिंचन करण्यासाठी धडपडत आहे. मात्र त्यांना वीज मिळत नाही. यामुळे ओलित करणे अवघड झाले आहे. यातून कृषी क्षेत्राचे आर्थिक गणित बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने निदान स्वत:चेच वेळापत्रक पाळण्याची गरज आहे. (शहर वार्ताहर)