एकाच महिन्यात सहा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: March 18, 2015 02:24 IST2015-03-18T02:24:07+5:302015-03-18T02:24:07+5:30
यवतमाळ-नेर मार्गावर एक महिन्याच्या अंतराने सहा लोकांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

एकाच महिन्यात सहा अपघाती मृत्यू
सोनखास : यवतमाळ-नेर मार्गावर एक महिन्याच्या अंतराने सहा लोकांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावर असलेले मोठ्या प्रमाणात खड्डे, अनधिकृत ओव्हरलोड माल वाहतूक, अवैध प्रवासी वाहने आदी प्रवासातून हे अपघात घडले आहे. तरीदेखील बांधकाम व पोलीस विभाग यातून कोणताही बोध घेण्यास तयार नाही. या दोन्ही विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती लोकांना आपला जीव गमवावा लागेल, हे येणारा काळच ठरवेल.
यवतमाळ ते नेर या ३५ किलोमीटर अंतराच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. या मार्गावर ओव्हरलोड माल वाहतूक नित्याचीच झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठमोठ्या कंटेनरद्वारे ओव्हरलोड मालवाहतूक होत आहे. त्यातून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच अनेक चालक मद्य प्राशन करून वाहने चालवितात. तर अनेकदा रात्रीच्या सुमारास चालकाला झोपेची डुलकी आल्यानंतर खड्ड्यांमध्ये उसळून अपघात होत आहे.
अनेक ट्रकचालक रात्रीच्या सुमारास ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून नशापाणी करताना आढळतात. मात्र याकडे संबंधित विभागांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. या मार्गातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा रोडला लागून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून शाळेत जावे लागते. बांधकाम विभागाने अनेक गावात स्पीड ब्रेकर न लावल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
लासीना, उत्तरवाढोणा व सोनखास ही दुतर्फा असलेली गावे आहे. लासिना येथे दोन तीन दिवसांपूर्वीच अंगणात उभ्या असलेल्या एका युवकास कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. अशा किती तरुणांना रस्त्यावर आपला जीव गमवावा लागेल तेव्हा बांधकाम विभागाला जाग येईल, असा प्रश्न आता गावकरी विचारू लागले आहे. प्रत्येक गावात दोन्ही बाजूला गतिरोधक बसवावे तसेच पोलीस विभागाने रस्त्यावरील अनधिकृत ओव्हरलोड आणि अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)