१५ तालुक्यांची स्थिती चिंताजनक
By Admin | Updated: August 14, 2014 00:05 IST2014-08-14T00:05:42+5:302014-08-14T00:05:42+5:30
सुरुवातीपासूनच दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे सावट उभे केले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ तालुक्यांची पीक स्थिती अतिशय गंभीर असून या तालुक्यात ५० टक्क्यापेक्षा

१५ तालुक्यांची स्थिती चिंताजनक
यवतमाळ : सुरुवातीपासूनच दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे सावट उभे केले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ तालुक्यांची पीक स्थिती अतिशय गंभीर असून या तालुक्यात ५० टक्क्यापेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. पिकांंना वाढीसाठी पोषक वातावरण नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा यंदा सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. जून ते आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यात सरासरी ७० ते ८० टक्के पाऊस कोसळतो. मात्र यावर्षी केवळ ३३ टक्केच पाऊस कोसळला आहे. यामुळे पिकांची स्थिती चिंताजनक झाली आहे. शेतातील पिके करपत चालली असून शेतकरी आकाशाकडे पाहत आहे.
यवतमाळ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. आॅगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात ३०४.८४ मिमी पाऊस झाला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ३३.५० टक्के आहे. नेर तालुक्यात ५७.१० टक्के पावसाची नोंद आहे. इतर तालुक्यात स्थिती गंभीर आहे. यवतमाळमध्ये ४८.५६ टक्के, बाभूळगाव ४८.७२ टक्के, कळंब २८.५८ टक्के, आर्णी ३०.९८ टक्के, दारव्हा ३६.१४ टक्के, दिग्रस २३.८५ टक्के, पुसद २०.१० टक्के, उमरखेड १९.८६ टक्के, महागाव २३.६४ टक्के, केळापूर २२.९४ टक्के, घाटंजी २२.९८ टक्के, राळेगाव ३५.३९ टक्के, वणी ४२.८१ टक्के, मारेगाव ४४.८३ टक्के आणि झरीजामणीत २९.४८ टक्के पावसाची नोंद झाली. साधारणत: आॅगस्ट महिन्यात ५० टक्के पेक्षा पाऊस कमी असलेले तालुके शासन दुष्काळग्रस्त घोषित करते. (शहर वार्ताहर)