सीताफळांची आवक वाढली, भाव मात्र वधारले
By Admin | Updated: October 24, 2016 01:09 IST2016-10-24T01:09:47+5:302016-10-24T01:09:47+5:30
आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऐन थंडीच्या दिवसात येणारी सीताफळे बाजारात दाखल झाली आहेत.

सीताफळांची आवक वाढली, भाव मात्र वधारले
पावसामुळे यंदा चांगला बहर : माळरानावर नैसर्गिकपणे लगडलेल्या फळांची गोडीच न्यारी
पुसद : आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऐन थंडीच्या दिवसात येणारी सीताफळे बाजारात दाखल झाली आहेत. दमदार पावसामुळे यंदा सीताफळाच्या झाडांना चांगलाच बहर आला आहे. पुसदच्या बाजारात चांगल्या प्रतीचे सीताफळ चाळीस ते पन्नास रुपये किलोने विकले जात असून सर्वच स्तरातील लोकांमध्ये आवडीचा असलेला हा रानमेवा महागला आहे.
पुसद परिसरात डोंगराळ माळरानावर सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात असून इतरही डोंगराळ भागात तुरळक प्रमाणात झाडे आहेत. शेतकरी दरवर्षी विक्रीसाठी बाजारात सीताफळे आणतात. त्यातून अनेकांना चांगले उत्पन्न मिळते. पुसद तालुक्यात सीताफळाचे आवर्जुन उत्पन्न घेणारे शेतकरी कमीच आहे. परंतु तालुक्यातील डोंगराळ भागात सीताफळाची अगणित झाडे आहेत. मागील तीन वर्षाच्या दुष्काळामुळे झाडांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु यंदा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून झालेल्या १५ दिवसाच्या मुसळधार पावसामुळे डोंगरातील सीताफळांची झाडेही मोहरली आहेत. यंदा डोगरातील झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत.
शेतजमिनीमध्ये उत्पादित केलेल्या सीताफळापेक्षा माळरानावर नैसर्गिकरीत्या लगडलेल्या सीताफळांची गोडीच न्यारी आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ डोंगरातील सीताफळांची चव चाखण्यासाठी आतुर असतात. मेंढपाळ, पशुपालक दोन महिने ताजी सीताफळे खाण्याचा आनंद घेतात. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सीताफळे परिपक्व होतात.
पिकण्याअगोदर काढलेली फळे साधारण चार दिवसात पिकतात. मशागतीशिवाय फळे हातात येत असल्याने उत्पादकांना आणि मजुरांनाही त्याची किंमत वाटत नाही. महिला, शाळकरी मुले सीताफळे तोडून विक्रीस आणतात. त्यांना यातून ४०० ते ५०० रुपये प्रतिदिन रोजगार मिळत आहे. या फळाच्या वाढीपासून ते पिकविण्यापर्यंत कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा अवलंब सध्या तरी होत नसल्याने सीताफळाची आवर्जून खरेदी होत असते. शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी परगावी असलेली मंडळी दिवाळीच्या निमित्ताने घरी परतल्यामुळे घाऊक प्रमाणात सीताफळाची खरेदी करून त्याचा सामूहिक आस्वाद घेतला जातो. मात्र गोडी वाढण्यासोबतच सीताफळांचे भावही चांगलेच वाढले आहेत. (तालुका प्रतिनिधी)