महायुती मेळाव्यात लाेकसभा उमेदवारीवरून संघर्षाची चिन्हे, भावना गवळी उमेदवारीवर ठाम

By सुरेंद्र राऊत | Published: January 14, 2024 07:23 PM2024-01-14T19:23:58+5:302024-01-14T19:24:10+5:30

इंद्रनील नाईकांनी ठेवला बंजारा महिलेचा प्रस्ताव

Signs of struggle over Lok Sabha candidature in Mahayuti Mela, Bhavna Gawli insists on candidacy | महायुती मेळाव्यात लाेकसभा उमेदवारीवरून संघर्षाची चिन्हे, भावना गवळी उमेदवारीवर ठाम

महायुती मेळाव्यात लाेकसभा उमेदवारीवरून संघर्षाची चिन्हे, भावना गवळी उमेदवारीवर ठाम

यवतमाळ : लाेकसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकदिलाने काम करावे, यासाठी रविवारी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उमेदवार काेण? यावरून थेट आव्हानाची भाषा सुरू झाली. भावना गवळी यांनी ‘मेरी झाशी मै नही दुुंगी’ म्हणत यवतमाळ - वाशिम लाेकसभेवर आपलाच दावा असल्याचे सांगितले. तर आमदार इंद्रनील नाईक यांनी येथे बंजारा समाजातील महिलेला उमेदवारी मिळावी, असा प्रस्ताव ठेवला. यानंतर महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी सावध पवित्रा घेत श्रेष्ठींनी दिलेल्या उमेदवारासाठी काम करायचे, अशी भूमिका घेतली. एकूणच लाेकसभा उमेदवारीवरून महायुतीतही धुसफूस सुरू असल्याचे कार्यकर्त्यांसमाेरच उघड झाले. 

मेळाव्याचे प्रास्ताविक आमदार मदन येरावार यांनी केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा असल्याचे सांगत, यासाठी महायुतीतील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने बुथस्तरावर एकदिलाने काम करावे, असे आवाहन केले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मनाेमिलन मेळावा यवतमाळमधील जांब राेडलगतच्या हॉटेलमध्ये रविवारी दुपारी पार पडला. निवडणुकीच्या आधी नेते तसेच पदाधिकाऱ्यांचे मनाेमिलन होऊन निवडणुकीत आपसात मतभेद नसावेत, हा या मेळाव्यामागचा उद्देश असल्याचे नेत्यांनी सांगितले. 

महायुतीतील उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष यावेळी दिसून आला. महायुतीच्या मेळाव्याला संबोधन करताना राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाच्या महिलेला उमेदवारी देऊन प्रतिनिधीत्व देण्याची थेट मागणी केली. यासाठी त्यांनी लोकसभा मतदार संघातील सामाजिक संख्याबळाचा दाखल दिला. या उमेदवारीची मेळाव्यात घाेषणा करावी, अशी मागणी नाईक यांनी केली. त्यांच्या मागणीमुळे मंचावर बसलेल्या अनेकांना धक्काच बसला तर काही सुखावले, तसेच सभागृहात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी  टाळ्या वाजवून या मागणीला प्रतिसाद दिला.  आमदार नाईक यांच्यानंतर खासदार भावना गवळी यांनी उमदेवारी जाहीर करण्याच्या मागणीचा  धागा पकडत ‘मेरी झाँशी नही दुगीं’ म्हणत पाचवेळची खासदार असून, येत्या निवडणुकीतही आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचा दावा केला. या बहिणीची काेणालाही कोणतीच अडचण नाही, कुठेही हस्तक्षेप नसल्याचे म्हणत भावनिक सादही घातली. महायुतीकडे दुसरी महिला कोण? असा प्रश्नही खासदार गवळी यांनी उपस्थित केला. पालकमंत्री संजय राठाेड यांनी लाेकसभा लढविली तर मी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात लढण्यास तयार असल्याचेही भावना गवळी यांनी यावेळी सांगितले. 

 पालकमंत्री  संजय राठोड यांनी महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे सांगत वादापासून दूर राहणे पसंत केले. यानंतर  प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी, रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी  मार्गदर्शन केले. या मेळाव्याला आमदार प्रा. डाॅ. अशोक ऊईके, आमदार ॲड. नीलय नाईक, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार नामदेव ससाणे, आमदार डाॅ. संदीप धुर्वे, भाजप जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, तारेंद्र बोर्डे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कालिंदा पवार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार यांच्यासह महायुतीतील  भाजप, शिवसेना शिंदे गट, प्रहार जनशक्ती पक्ष, रिपाइं आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

Web Title: Signs of struggle over Lok Sabha candidature in Mahayuti Mela, Bhavna Gawli insists on candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.