जिल्ह्यातील ३४२ लघुसिंचन तलावांमध्ये ठणठणाट
By Admin | Updated: April 18, 2017 00:02 IST2017-04-18T00:02:26+5:302017-04-18T00:02:26+5:30
जिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली. सर्व सिंचन प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले. उन्हाळ्यात पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल अशी आशा होती.

जिल्ह्यातील ३४२ लघुसिंचन तलावांमध्ये ठणठणाट
रूपेश उत्तरवार यवतमाळ
जिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली. सर्व सिंचन प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले. उन्हाळ्यात पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल अशी आशा होती. प्रत्यक्षात उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील ३४२ तलाव कोरडे पडले. तर चार लघु प्रकल्पातही ठणठणाट निर्माण झाला आहे. यामुळे पाटबंधारे विभागही अवाक झाला आहे. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलस्त्रोत वृद्धिंगत करण्यात आले. पावसाचे पाणी संचित करण्यात मोठ्या प्रमाणात यश आले. मात्र हा जलसाठा अधिक काळ टिकला नाही. यातून जिल्ह्यात पाणी टंचाईचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत ६९ सिंचन तलाव आहेत. यात २९ हजार ६२५ टीसीएम पाणी साठा होतो. आता ३५ तलाव कोरडे पडले असून ३४ तलावामध्ये २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात २५० पाझर तलाव आहेत. यात ६३ हजार ५९८ टीसीएम जलसाठा होता. आता २०० तलाव कोरडे पडले आहे. ५० तलावात १५ टक्के पाणी आहे. ५ साठवण तलावात ९५२ टीसीएम पाणी साठा होतो. दोन तलावात केवळ २० टक्के पाणी आहे. ५५ गाव तलावांची क्षमता पाच हजार ३४८ टीसीएमची आहे. हे तलाव कोरडे पडले आहे. ५० ब्रिटीशकालीन तलावाची सिंचन क्षमता चार हजार ६९६ टीसीएम असून सर्व तलाव सध्या कोरडे पडले आहेत. अशीच अवस्था पाटबंधारे विभागातील सिंचन तलावांची आहे. हे प्रकल्प पावसाळ्यात ओव्हर फ्लो झाले होते. आता या प्रकल्पात सरासरी २९.३७ टक्के पाणी आहे. गत सात महिन्यात प्रकल्पातील ७१ टक्के पाणी रिकामे झाले. तर अनेक लघु प्रकल्प तळ गाठण्याच्या स्थितीत आहे. ६२ पैकी चार लघु प्रकल्प कोेरडे पडले आहेत. यामध्ये नेर, रूई, किन्ही आणि बोरडा प्रकल्पाचा समावेश आहे. मोठ्या पूस प्रकल्पात ३०.२१ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पात ३४.६१ टक्के पाणी शिल्लक आहे. ६२ लघु प्रकल्पात केवळ २१ टक्के पाणी शिल्लक राहीले आहे.