बोरी महलचे चिमुकले वॉटर कपच्या लघु चित्रपटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:12 IST2018-04-24T22:12:56+5:302018-04-24T22:12:56+5:30
गाव पाणीदार करण्यासाठी जिल्ह्यात गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात श्रमदानात व्यस्त आहे. त्यांच्या या कार्यात चिमुकलेही मागे नाही. मोठ्यांचा आदर्श घेत चिमुकल्यांनी या स्पर्धेत खारीचा वाटा उचलला.

बोरी महलचे चिमुकले वॉटर कपच्या लघु चित्रपटात
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : गाव पाणीदार करण्यासाठी जिल्ह्यात गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात श्रमदानात व्यस्त आहे. त्यांच्या या कार्यात चिमुकलेही मागे नाही. मोठ्यांचा आदर्श घेत चिमुकल्यांनी या स्पर्धेत खारीचा वाटा उचलला. याची माहिती सिनेअभिनेता आमीर खान यांच्यापर्यंत पोहोचली. चिमुकल्यांना भेटून त्यांचे मनोबलच वाढविले नाही तर आपल्या वॉटर कप स्पर्धेच्या लघु चित्रपटातही स्थान दिले. हे चिमुकले आहेत कळंब तालुक्यातील बोरी महलचे.
कळंब तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने गावागावात वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान सुरू आहे. दररोज श्रमदान करून गाव पाणीदार करण्याचा दृढ संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या या कार्यात बोरी महल येथील १४ ते २० वयोगटातील विद्यार्थीही सहभागी झाले. या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली ते कळंब तहसील कार्यालयात आयोजित पाणी फाऊंडेशनच्या प्रदर्शनातून. प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांनी आपले गाव पाणीदार करण्याचा निश्चिय केला. दर रविवारी गावात स्वच्छता अभियान राबविणे सुरू केले. त्यानंतर दैनंदिन अभियान राबविणे सुरू झाले. झाडे लावा उपक्रम हाती घेतला. एवढेच नाही तर चिमुकल्यांनी रोपवाटिकाही तयार केली. विद्यार्थ्यांची गँग आता शोषखड्डे तयार करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. बंधाºयांची आखणी करून देण्यात विद्यार्थ्यांचा हातखंड झाला आहे. ढाळीचे बांध व इतर बंधारे तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. एवढेच नव्हेतर गावात गॅबियन स्ट्रक्चरचा बंधारा बांधण्यासाठी वर्गणी गोळा करून लोखंडी जाळी खरेदी केली. गावात यामुळे नवचैतन्य निर्माण झाले. पूर्वज डोंगरकरच्या नेतृत्वात यश निकुडे, आदर्श भानखेडे, चेतन भानखेडे, तेजस कांबळे, शिवम पंधरे, अभय राहाणहिरे, हेमंत चुनारकर, प्रज्वल शिवरकर, प्रशिक कांबळे, ओम पंधरे, सचिन शिवरकर, दुर्गेश रहाणहिरे, आकाश गायकवाड, रोशन निकुडे, चेतन निकुडे, अनिकेत निकुडे, अजय वाघाडे, मंगेश कांबळे, शुभम थूल, ज्ञान निकोडे, आशीष मेश्राम, यश चौधरी गाव पाणीदार करीत आहे. या सर्वांना मेकॅनिकल इंजिनिअर रवी राहणहिरे मार्गदर्शन करीत आहे. अभियंता असलेला हा तरुणही गावात श्रमदानासाठी तळ ठोकून आहे. बोरी महलच्या या विद्यार्थ्यांची महती पाणी फाऊंडेशनचे सर्वेसर्वा अभिनेता आमीर खान यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी या विद्यार्थ्यांना खंडाळा येथे भेटण्यास बोलावले. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कार्याची प्रशंसा केली. एवढेच नाही तर लघु चित्रपटात सर्वांना स्थान दिले. काही भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.
अधिकाऱ्यांचे सक्रिय मार्गदर्शन
वॉटर कप स्पर्धेसाठी कळंब तालुक्यातील गावागावात जावून उपविभागीय अधिकारी संदीप अपार व तहसीलदार रंजित भोसले मार्गदर्शन करीत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होवून गावेच्या गावे स्पर्धेत सहागी होत आहे. आगामी काळात दुष्काळावर मात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.