गल्लीबोळात शिकवणी वर्गांची दुकानदारी
By Admin | Updated: July 15, 2014 00:15 IST2014-07-15T00:15:08+5:302014-07-15T00:15:08+5:30
पुसद शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाची दुकानदारी सुरू आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे भांडवल करीत लाखो रुपये कमावले जात आहे. या शिकवणी वर्गामुळे पालक अगतिक झाले

गल्लीबोळात शिकवणी वर्गांची दुकानदारी
पुसद : पुसद शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाची दुकानदारी सुरू आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे भांडवल करीत लाखो रुपये कमावले जात आहे. या शिकवणी वर्गामुळे पालक अगतिक झाले असून मुलांना शिकवणी वर्गाला पाठविण्यासाठी धडपड सुरू आहे. यामुळे नामवंत शाळा, महाविद्यालयाच्या तासिका बुडवून विद्यार्थी शिकवणी वर्गात नियमित जाताना दिसतात.
स्पर्धेच्या युगात टक्केवारीला महत्त्व आले आहे. प्रत्येक पालकाला आपला मुलगा ९० टक्केच्यावरच गुण घेणारा असावा, असे वाटते. यासाठी तो वाट्टेल तो करायला तयार असतो. याच मानसिकतेचा फायदा शिकवणी वर्ग चालकांनी घेतला आहे. पुसद शहरातील गल्लीबोळात शिकवणी वर्ग सुरू झाले आहे. नर्सरीपासून अभियांत्रिकीपर्यंत शिकवणी वर्ग सुरू आहे. आपल्याकडे विद्यार्थी खेचण्यासाठी सध्या या शिकवणी वर्ग चालकाचे जाहिरात युद्ध सुरू आहे. दहावी-बारावीच्या निकालानंतर आपल्या क्लासच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे फोटो फ्लेक्सवर लावून जाहिरात केली जात आहे. याठिकाणी कोणत्या सुविधा मिळणार याचीही माहिती दिली जाते. शहरात नजर टाकली तरी विविध शिकवणी वर्गांचे फलक दृष्टीस पडतात. मात्र याच शिकवणी वर्गातून नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी मात्र शिकवणी संचालक झटकताना दिसून येतात. ते आमचे विद्यार्थी असले तरी त्यांनी अभ्यास केलाच नसेल, असे सांगतात. गुणवंताचे श्रेय घ्यायचे आणि नापासांना दूर करायचे, असा हा प्रकार सुरू आहे.
शिकवणी वर्गांचे पेव फुटल्याने शाळा-महाविद्यालयात जाण्याऐवजी विद्यार्थी शिकवणी वर्गात नेहमी जात आहे. याठिकाणी कोणत्या सुविधा आहे, याची चाचपणीही पालक करीत नाही. मुलगा सांगतो म्हणून त्याच शिकवणी वर्गाला पाठविले जाते. भरमसाठी फी घेऊन गुणवंतांना गुणवंत करणारे हे शिकवणी वर्ग नापासांना कधी पास करतील, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र शिक्षणाच्या या बाजारीकरणापुढे पालक अगतिक दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)