ट्रकच्या धडकेत पती-पत्नी ठार
By Admin | Updated: December 10, 2015 02:32 IST2015-12-10T02:32:59+5:302015-12-10T02:32:59+5:30
कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार तर एक तरुण गंभीर जखमी झाला.

ट्रकच्या धडकेत पती-पत्नी ठार
वणीतील अपघात : तरुण गंभीर जखमी, ट्रक शिरला चहा टपरीत
वणी : कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार तर एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना वणीनजीकच्या एका जिनिंगसमोर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
प्रभाकर सखाराम पिदूरकर (६०) आणि गीता प्रभाकर पिदूरकर (५०) रा. कोलेरा अशी मृत पती-पत्नीचे नाव आहे. तर सुरज पुंजाराम पिदूरकर (२२) असे जखमीचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी कोलेरा येथून पिदूरकर परिवार दुचाकीने (एम.एच.२९- एजी-२९५९) वणीकडे येत होता. त्यावेळी कोलेरा पिंपरीकडे एका कोळसा खाणीकडे भरधाव हायवा ट्रक जात होता. वणीनजीकच्या एका जिनासमोर या ट्रकने दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की, दुचाकी काही अंतरावरपर्यंत फरफटत गेली. यात दुचाकीवरील प्रभाकर, गीता पिदूरकर आणि सुरज गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ तिघांनाही वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी प्रभाकर व गीता या दाम्पत्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
तर सुरजवर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी चंद्रपूरकडे रवाना करण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो नजीकच्या एका चहा टपरीत शिरला.
मात्र चहाटपरी बंद असल्याने अनर्थ टळला. अपघातानंतर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक असलम खान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)