वीज वितरणच्या बिलाचा ग्राहकांना शॉक
By Admin | Updated: November 17, 2014 23:03 IST2014-11-17T23:03:06+5:302014-11-17T23:03:06+5:30
वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य ग्राहकांची सातत्याने थट्टा केली जात आहे. घरगुती वीज वापराचे बीलही हजारोंच्या घरात येत असल्याने अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

वीज वितरणच्या बिलाचा ग्राहकांना शॉक
यवतमाळ : वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य ग्राहकांची सातत्याने थट्टा केली जात आहे. घरगुती वीज वापराचे बीलही हजारोंच्या घरात येत असल्याने अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. महिन्याच्या शेवटी विजेचे बील हाती पडेपर्यंत ग्राहक धास्तावलेल्या अवस्थेतच असतो. दर महिन्याला अव्वाच्यासव्वा वीज बील देऊन वितरण कंपनी ग्राहकांना एक प्रकारे शॉक देत आहे.
घरातील वीज उपकरणे आणि त्यांचा वापर याच्याशी वीज कंपनीने दिलेल्या बिलाचा कोठेही ताळमेळ जुळताना दिसत नाही. साधारणत: महिन्याकाठी घरगुती मिटरचे बील किती आले याचा अंदाज त्या ग्राहकांना असतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून चक्राऊन सोडणारे वीज देयक वितरण कंपनीकडून दिले जात आहे. अनेक नागरिक वितरण कंपनीच्या कार्यालयात अवास्तव आलेले वीज बील कमी करून देण्याचे अर्ज घेऊन जाताना दिसत आहे. या नागरिकांना कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून कधीही न समजणारे गणित सांगून आल्या पावली परत पाठविले जाते.
महिन्या अखेरपर्यंत वीज बील भरले नाही तर पुरवठा कापण्याची धमकी दिली जाते. बऱ्याचदा एवढ्या महिन्याचे बील भरून टाका, पुढे त्रास होणार नाही असा आगाऊचा सल्ला दिला जातो. एकवेळची कटकट नको म्हणून आर्थिक भुर्दंड सोसण्याची तयारी दाखवत वीज बील भरले तरी ग्राहकाची सुटका होत नाही. पुन्हा दोन महिन्यांनी असाच अवास्तव आकडा असलेले बील त्याच्या माथी मारले जाते. याबाबत दाद मागण्याची सोय कुठेच नाही. वीज कंपनीकडून वीज बील देण्यासाठी नियमित मिटर रिडिंग नेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र कुणाच्याच घरी रिडिंग घेण्यासाठी कर्मचारी फिरकत नसल्याचे दिसते. अंदाजशीर महिन्याचा वीज वापर दाखवून विजेचे बील दिल्या जाते. कधीतरी अधेमधे एखाद्यावेळेस मिटर रिडिंग घेऊन त्या आधारावरच कित्येक महिने बील दिले जाते. हिवाळ््याचे दिवस असल्यामुळे सध्या
तुलनेने विजेचा वापर कमी आहे.
मात्र उन्हाळ््यातील गर्मीत न येणारे वीज बील आता हिवाळ््यातच येत आहे. वितरण कंपनीच्या या अडेलतट्टु धोरणामुळे अनेकांना आर्थिक संकटात टाकले आहे. सोयीसुविधा देण्यासाठी सदैव नकारघंटा वाजविणारी वीज वितरण कंपनी सरळसरळ अवास्तव बील पाठवून ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारत असल्याचे चित्र यवतमाळ शहरात पहावयास मिळत आहे.
पेन्शनर्स असलेल्या ग्राहकांना दोन ते आठ हजार इतके वीज बील महिन्याकाठी दिल्या जात आहे. तीन खोल्याच्या घरात महिन्याभरात आठ हजारांची वीज जळते कशी
याचा शोध वितरणच्या अभियंत्यांकडून घेतला जावा अशी मागणी होत आहे. मात्र कंत्राटदारांशी हातमिळवणी करून काही अधिकाऱ्यांनी ग्राहकांची लूट करण्याचा चंगच बांधला असल्याने अनेकांचा नाईलाज होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)