घाटंजी पालिकेत शिवसेनेचा ‘बेमुदत मुक्काम’
By Admin | Updated: December 4, 2015 02:41 IST2015-12-04T02:41:07+5:302015-12-04T02:41:07+5:30
नगरपरिषदेने आझाद मैदान परिसरात सुरू केलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामामुळे दुर्गादेवी भक्तांचा रस्ता बंद होणार आहे.

घाटंजी पालिकेत शिवसेनेचा ‘बेमुदत मुक्काम’
घाटंजी : नगरपरिषदेने आझाद मैदान परिसरात सुरू केलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामामुळे दुर्गादेवी भक्तांचा रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे या बांधकामात बदल करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर यांच्या नेतृत्वात नगरपालिकेत बेमुदत ‘मुक्काम ठोको आंदोलन’ गुरुवारपासून सुरू केले.
आठवडीबाजार (आझाद मैदान) परिसरात ६२ वर्षांपासून दुर्गादेवीची स्थापना दरवर्षी केली जात आहे. या जागेवर आयोजकांनी ओटा बांधून टिनपत्र्याचे शेडसुद्धा उभारले आहे. माता दुर्गादेवी ही घाटंजीच्या बहुतांश नागरिकांचे आराध्य दैवत आहे. मातेच्या चरणी त्यांच्या धार्मिक भावना जुळल्या आहेत. या मैदानाच्या पूर्वेकडील बाजूने नगरपरिषदेने शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू केले आहे. या विकास कामाला आपला विरोध नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. मात्र ज्या पूर्व दिशेकडून उगवत्या सूर्याची किरणे मातेच्या चरणावर पडतात आणि ज्या दिशेने भक्तगण देवीच्या दर्शनाला येतात, तोच मुख्य रस्ता या कॉम्प्लेक्समुळे बंद होणार आहे. केवळ रस्त्याची जागा सोडून देऊन कॉम्प्लेक्सचे बांधकाम करावे, रस्ता लोकांसाठी मोकळा ठेवावा, अशी रास्त मागणी करीत शिवसेनेने आठवडीबाजार परिसरात दोन दिवस ‘जागर आंदोलन’ केले. परंतु नगरपरिषदेने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे गुरुवारपासून नगरपरिषदेच्या आवारात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर यांच्या नेतृत्वात ‘बेमुदत मुक्काम आंदोलन’ सुरू केले. मुख्याधिकारी, अभियंता व इतर कर्मचारी कार्यालयात हजर राहात नाही. चर्चा करण्यासाठी एकही जण पुढे येत नाही. वरिष्ठांना निवेदन देवूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास घाटंजी बंदचे आयोजन करण्यात येईल. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर रास्ता रोको करण्याचा इशाराही शैलेश ठाकूर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)