शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जाहीर

By Admin | Updated: July 8, 2015 00:04 IST2015-07-08T00:04:40+5:302015-07-08T00:04:40+5:30

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिल्हा शिवसेनेत खांदेपलट झाले आहे. नवे प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून वणीचे माजी आमदार विश्वास नांदेकर आणि येथील संतोष ढवळे

Shivsena's district chief declared | शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जाहीर

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जाहीर

मुंबईत घोषणा : विश्वास नांदेकर, संतोष ढवळे यांची वर्णी, अनेकांचा हिरमोड
यवतमाळ : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिल्हा शिवसेनेत खांदेपलट झाले आहे. नवे प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून वणीचे माजी आमदार विश्वास नांदेकर आणि येथील संतोष ढवळे यांच्या नावाची घोषणा शिवसेना भवन मुंबईतून करण्यात आली आहे.
विश्वास नांदेकर यांच्याकडे जिल्हा प्रमुख म्हणून वणी, आर्णी-केळापूर आणि राळेगाव या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर संतोष ढवळे यांना यवतमाळ, दिग्रस, पुसद व उमरखेड या चार विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष असे, हे दोनही जिल्हा प्रमुख प्रभारी राहणार आहेत. त्यांच्यातील कर्तृत्व व पक्ष बांधणीची तळमळ पाहून त्यांना पुढे कायम ठेवायचे की नाही याचा निर्णय पक्ष श्रेष्ठींकडून घेतला जाणार आहे.
शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती. मुळात दुय्यम पदावर काम करणाऱ्या डझनावर पदाधिकाऱ्यांची जिल्हा प्रमुख होण्याची अनेक वर्षांपासूनची मनिषा होती. परंतु गेली कित्येक वर्षे त्यांना संधीच मिळत नव्हती.
यावेळी राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले आणि या स्पर्धेतील पदाधिकाऱ्यांच्या इच्छेला जणू अंकुर फुटले. त्यातच नि:पक्ष बाण्याचे संपर्क प्रमुख जिल्ह्याला लाभल्याने या इच्छुकांच्या जिल्हा प्रमुख होण्याच्या आशा आणखीनच पल्लवीत झाल्या होत्या. आपली वर्णी लागली नाही तरी चालेल, मात्र हाडाच्या कार्यकर्त्याला जिल्हा प्रमुख म्हणून किमान आता तरी संधी मिळावी, ही या पदाधिकाऱ्यांची भावना होती. अखेर सोमवारी मुंबईतून यवतमाळच्या दोन नव्या शिलेदारांच्या नावाची घोषणा झाली. ती करताना एक माजी आमदार आणि एक पक्ष कार्यकर्ता असा समतोल राखला गेला. विश्वास नांदेकर व संतोष ढवळे या दोघांच्या खांद्यावर संयुक्तपणे जिल्हा शिवसेनेची धुरा सोपविली गेली आहे. या स्पर्धेतील अनेकांचा मात्र हिरमोड झाला आहे.
जिल्हा प्रमुख होण्यासाठी त्यांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र खांदेपलट झाला यातच त्यांना मोठे समाधान वाटत आहे. कुणाचीही का वर्णी लागेना, नेतृत्व बदल महत्वाचा होता, अशा भावना शिवसेनेच्या गोटातून ऐकायला मिळत आहे. जी-हूजरीला थारा न देणारा, अभ्यासू व पारदशक कारभार असलेला संपर्क प्रमुख मिळाल्यानेच हे शक्य झाल्याचाही शिवसैनिकांचा सूर आहे.
जिल्हा शिवसेनेची धुरा गेली कित्येक वर्ष आमदार संजय राठोड व माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांच्याकडे होती. विधानसभेत त्यांना यावेळीही एकापेक्षा अधिक जागा वाढविता आल्या नसल्या तरी जिल्हा परिषद, नगर परिषदा, पंचायत समित्या व सहकारातील अनेक संस्थांवर त्यांनी शिवसेनेला मोठे यश मिळवून दिले. जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच सेना सत्तेत आली. स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारातील संस्थांवर वर्चस्व वाढविणे, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अधिकाधिक गावांमध्ये सत्ता मिळविणे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बांधणी करणे, गावागावात शाखा उघडणे आदी आव्हाने नव्या प्रभारी जिल्हा प्रमुखांपुढे राहणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Shivsena's district chief declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.