शिवसेनाही विधान परिषदेच्या रिंगणात

By Admin | Updated: November 2, 2016 00:47 IST2016-11-02T00:47:16+5:302016-11-02T00:47:16+5:30

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत तिहेरी लढत होण्याचे संकेत मिळत आहे.

Shivsena also in the Legislative Council | शिवसेनाही विधान परिषदेच्या रिंगणात

शिवसेनाही विधान परिषदेच्या रिंगणात

युतीचा उमेदवार : राष्ट्रवादीच्या अडचणीत भर
यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत तिहेरी लढत होण्याचे संकेत मिळत आहे. काँग्रेस प्रमाणेच भाजपा-शिवसेना युतीचाही उमेदवार रिंगणात उतरणार आहे. त्यासाठी थेट ‘मातोश्री’वर मोर्चेबांधणी केली गेली.
शिवसेनेकडून तानाजी सावंत, दराडे, कटारिया, पुसदचे डॉ. राजेश मालाणी यांची नावे चर्चेत होती. वृत्तलिहिस्तोवर या पैकी कुणाच्या नावावर मोहर उमटली हे अधिकृतरीत्या स्पष्ट झाले नाही. मात्र तानाजी सावंत यांच्या नावाला ‘मातोश्री’ची अधिक पसंती राहण्याची शक्यता शिवसेनेच्या सूत्रांनी वर्तविली आहे. सेनेचे नेमके उमेदवार कोण हे बुधवारी नामांकनानंतरच स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेच्या उमेदवारीच्या शर्यतीत टॉपवर असलेले तानाजी सावंत हे मूळ सोलापूर जिल्ह्याच्या माढा येथील आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथे त्यांचा भैरवनाथ साखर कारखाना आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाड्यात प्रचंड दुष्काळ पडला होता. या दुष्काळ निवारणासाठी तानाजी सावंत यांनी शिवजल क्रांती अभियान राबविले. या अभियानामुळेच तानाजी सावंत हे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘गुड बुक’मध्ये गेले. म्हणूनच त्यांना ‘मातोश्री’ची अधिक पसंती दर्शविली जाते. त्यांचे नाव निश्चित असल्याचे शिवसेनेच्या गोटात मानले जात असले तरी ऐनवेळी चेहरा बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने पांढरकवड्याचे माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांची उमेदवारी जाहीर केली. बुधवारी ते आपले नामांकन दाखल करणार आहे. भाजपा-शिवसेना युतीचा उमेदवार राहणार की नाही, ते विरोधी बाकावरील इच्छुकाला पाठिंबा तर देणार नाही, याबाबत प्रचंड संभ्रम होता. परंतु मंगळवारी रात्री हा संभ्रम दूर झाला. शिवसेनेने युतीचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. उमेदवार कोण यावर थेट ‘मातोश्री’वर शिक्कामोर्तब केले गेले. या निर्णयाने मात्र युतीच्या पाठिंब्यावर गड जिंकण्याची मनिषा बाळगणाऱ्या राष्ट्रवादीतील दोघांच्या स्वप्नांचा चांगलाच पालापाचोळा झाला. निर्णय ‘मातोश्री’कडे सोपवून भाजपा-सेना नेत्यांनी राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या चांगल्या मुसक्या बांधल्याची प्रतिक्रिया राजकीय गोटातून ऐकायला मिळत आहे. शिवसेनेचा हा उमेदवार विदर्भाबाहेरील असण्याची दाट शक्यता आहे. ते बुधवारी नामांकन दाखल करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनसुद्धा नामांकन दाखल केले जाईल. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा तिहेरी सामना पहायला मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यात संख्याबळाचे गणित जुळविताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. दरम्यान ना. राठोड व ना. येरावार यांच्यात मंगळवारी सायंकाळी दोन तास बंदद्वार चर्चा झाली. त्यात युतीच्या उमेदवाराच्या विजयाची रणनीती ठरविण्यात आल्याचे समजते. (कार्यालय प्रतिनिधी)

राष्ट्रवादीच्या नामांकनासाठी मुंडे येणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनेही बुधवारी विधान परिषदेसाठी नामांकन दाखल केले जाणार आहे. त्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे खास उपस्थित राहणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री मनोहरराव नाईकही उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

ऐनवेळी सूचक परत बोलविले
विधान परिषदेचे नामांकन दाखल करण्यासाठी दहा मतदार तथा लोकप्रतिनिधींची सूचक म्हणून स्वाक्षरी आवश्यक असते. राष्ट्रवादीच्या गोटातील अपक्ष म्हणून तयारी करणाऱ्या इच्छुकाने यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रातील दहा सदस्यांना सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यासाठी सोमवारी सायंकाळी कार्यालयात बोलविले होते. हे सर्व जण आपल्या मर्जीतील आहे, असे समजून त्यांना कॉल केला गेला. मात्र यातील तीन ते चार जणांनी आपल्या नेत्यांना ‘स्वाक्षरी करू काय’ अशी विचारणा केली. त्यावर संबंधित नेत्यांनी नकार दिल्याने या सदस्यांनी त्या संभाव्य अपक्षापुढे स्वाक्षरीसाठी आपली असमर्थता दर्शविली. या प्रकारामुळे संतापलेल्या त्या संभाव्य अपक्षाने युतीतील एका नेत्याशी बोलून आपली नाराजीही व्यक्त केली. त्यावर ‘नगरपंचायतीचे सूचक देतो’ असे सांगून त्या नेत्याने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Shivsena also in the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.