जिल्हा परिषदेत शिवसेना आक्रमक
By Admin | Updated: February 4, 2015 23:22 IST2015-02-04T23:22:09+5:302015-02-04T23:22:09+5:30
आतापर्यंत समाजात विविध मुद्यांवर आक्रमक असलेली शिवसेना राज्यात युतीची सत्ता स्थापन होताच काहीशी मवाळ झाली आहे. मात्र जिल्हा परिषदेतील शिवसेनेची आक्रमकता मात्र कायम आहे.

जिल्हा परिषदेत शिवसेना आक्रमक
यवतमाळ : आतापर्यंत समाजात विविध मुद्यांवर आक्रमक असलेली शिवसेना राज्यात युतीची सत्ता स्थापन होताच काहीशी मवाळ झाली आहे. मात्र जिल्हा परिषदेतील शिवसेनेची आक्रमकता मात्र कायम आहे. या आक्रमकतेपुढे सत्ताधारी पदाधिकारी आणि प्रशासन काहीसे नमते घेत असल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. डॉ. आरती फुपाटे यांच्या रुपाने अध्यक्षपद पुसद विभागाला मिळाले आहे. सुशिक्षित असलेल्या फुपाटे यांनी अध्यक्षपदी विराजमान होताच आक्रमक पद्धतीने कामकाज सुरू केले होते. ग्रामीण भागात भेटी, आपल्या कार्यालयांची अकस्मात तपासणी करून वचक निर्माण करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्यांना प्रशासन व अन्य पदाधिकाऱ्यांकडून तेवढी साथ मिळाली नाही. उलट सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते लेटलतिफ कर्मचाऱ्यांची पाठराखण करताना दिसून आले. त्यामुळे अध्यक्षांचा इन्टरेस्ट कमी झाला, त्यांनीही जिल्हा परिषदेला शिस्त लावण्याचा नाद सोडला.
अध्यक्षपद अद्याप पुसदच्या बाहेर निघाले नसल्याचा सूर आहे. अध्यक्षांच्या पुसद ओरिएन्टेड कारभारावर जिल्हा परिषदेत नाराजी पाहायला मिळते. मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने प्रचंड आक्रमकता दाखविली. त्यांच्या या आक्रमकतेपुढे सत्ताधारी पदाधिकारी आणि दीर्घ अनुभवी प्रशासनही बॅकफूटवर आले. त्यातूनच बैठकीला बीडीओंच्या हजेरीचा निर्णय फिरवावा लागला. मला मंत्रालयातील अनुभव आहे, मी सचिवांशी, उपसचिवांशी बोललो, आयुक्तांशी बोलतो, मी स्वत: लक्ष घालतो, बैठक लावतो, चौकशी करतो, अहवाल देतो, माहिती घेतो अशी उत्तरे देऊन आतापर्यंत सदस्यांना चूप करणाऱ्या प्रशासनावर मंगळवारी स्वत:च चूप होण्याची वेळ शिवसेनेच्या आक्रमकतेने आणली. शिवसेनेच्या या आक्रमकतेला राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये एखाद-दोन सदस्यांनीही अध्यक्षांवर प्रश्नांचा भडीमार करून हातभार लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या या आक्रमकतेमागे कृषी प्रदर्शनाच्या दीड कोटींच्या देयकाचा स्वार्थ असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. राज्यातील सत्तेत सहभागी असल्याने शिवसैनिकांना बाहेर आक्रमकतेबाबत स्वत:ला आवर घालावा लागत आहे. आपण सत्तेत आहो याचे सतत स्मरण ठेऊन शिवसैनिक स्वत:ला सावरत आहे. जिल्हा परिषदेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने जणू शिवसैनिकांना तेथे मोकळीक आहे. आक्रमकता दाखविण्याचे सध्या तरी हे एकमेव दालन शिवसैनिकांसाठी खुले असल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषदेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारावर कुणीच फार समाधानी नाही. सत्ताधारी सदस्यांमधून कुरबुर ऐकायला मिळत आहे. रुटीन विषय आणि अधिकाऱ्यांची रुटीन उत्तरे एवढेच काय ते सुरू आहे. जिल्हा परिषदेतील विविध बैठकाही केवळ ‘खानापुरती’ ठरू लागल्या आहेत. वर्षानुवर्षे एक सारखीच उत्तरे देऊन अधिकारी वेळ मारुन नेताना दिसत आहे. एकूणच जिल्हा परिषदेत राजकीय किंवा प्रशासकीय पातळीवर कुठेच आलबेल नाही, एवढे निश्चित. (जिल्हा प्रतिनिधी)