शिवार संवाद सभेत पालकमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती
By Admin | Updated: May 30, 2017 01:17 IST2017-05-30T01:17:54+5:302017-05-30T01:17:54+5:30
‘इमेज बिल्डिंग’साठी सुरू असलेल्या भाजपाच्या शिवार संवाद सभेत ‘सरकारी मन की बात’ ऐकण्याऐवजी शेतकऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती होत आहे.

शिवार संवाद सभेत पालकमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती
बोरी अरब : तुरीच्या मोबदल्यावर निरूत्तर, दत्तक गावातच विकास कामांना खो
संतोष तांगडे । लोकमत न्यूज नेटवर्क
बोरीअरब : ‘इमेज बिल्डिंग’साठी सुरू असलेल्या भाजपाच्या शिवार संवाद सभेत ‘सरकारी मन की बात’ ऐकण्याऐवजी शेतकऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती होत आहे. पालकमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या बोरीअरबमध्ये तर गावकऱ्यांनी चक्क त्यांची बोलती बंद केली. तुरीचे पैसे केव्हा भेटणार, असा प्रश्न वृद्ध शेतकरी महिलेने विचारल्यावर थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रसंग पालकमंत्र्यांवर ओढवला. सामान्य गावकऱ्यांनी सरकारी धोरणांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधान या ‘संवादा’त होऊ शकले नाही.
येथील विठ्ठल मंदिरात रविवारी सायंकाळी ६ वाजता ही सभा झाली. सभेच्या समारोपातच वीज गेल्याने उर्जा राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच वीज टिकत नाही, तर सिंचनासाठी पूर्ण वेळ कशी मिळेल, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. शिवार संवाद सभेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ‘इमेज मेकिंग’साठी सरकारतर्फे हा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी शिवार संवादात उलट अनुभव येत आहे. बोरीअरब येथील सभेत ग्रामस्थांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्यावर सातत्याने प्रश्नांची सरबत्ती केली.
शंकुतलाबाई राजगुरे या शेतकरी महिलेने तुरीचे पैसे केव्हा देणार, असा प्रश्न केला. याचे ठोस उत्तर नसल्याने पालकमंत्र्यांनी केवळ औपचारिकता म्हणून महिनाभरात मिळेल, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पाकमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या बोरीअरबमध्ये कोणतेच विकासकाम झाले नाही. येथील नदी सफाईची घोषणा अजूनही पूर्ण झाली नसल्याची आठवण ग्रामस्थांनी करून दिली. यावर पालकमंत्र्यांनी १२ लाख ५० हजारांची तरतूद केल्याचे सांगितले. गाव दत्तक घेतल्यानंतर येथे एकही काम नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. प्रश्नांचा ओघ बघताच तासाभरात ही सभा आटोपण्यात आली. सभेच्या समारोपातच वीज पुरवठा खंडीत झाला. तो रात्री पहाटेपर्यंत आलाच नाही. उजेडात आलेल्या उर्जा राज्यमंत्र्यांना वीज गेल्याने काळोखातच शिवार संवाद सभेचा निरोप घ्यावा लागला.
उर्जा राज्यमंत्र्यांच्या सभेतच वीज गूल
दिलीप काकडे, कोंडेश्वर खडगी यांनी विजेच्या लपंडावाने त्रस्त असल्याचे उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना सांगितले. याबाबत तक्रारी करूनही वीज कंपनीचे अधिकारी कर्मचारी दखल घेत नसल्याची व्यथा मांडली. यावर उर्जा राज्यमंत्र्यांनी तातडीने वीज कं पनीच्या अधिकाऱ्याला फोन लावला. मात्र त्याने फोनलाही प्रतिसाद दिला नाही. शेवटी रविवार सुटीचा दिवस असल्याने अधिकारी भेटत नसल्याचे खुद्द राज्यमंत्र्यांनाच गावकऱ्यांपुढे कबुल करावे लागले. भरीस भर म्हणजे, संवाद सभा संपत असतानाच गावातील वीज गुल झाली, ती थेट पहाटेपर्यंत आलीच नाही.