मराठा सेवा संघाचा शिवजयंती उत्सव
By Admin | Updated: February 20, 2015 01:50 IST2015-02-20T01:50:20+5:302015-02-20T01:50:20+5:30
शत्रूनेही आपला आदर करावा असे वर्तन शिवाजी महाराजांचे होते. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, असे प्रतिपादन अभियंता चंद्रशेखर शिखरे यांनी केले.

मराठा सेवा संघाचा शिवजयंती उत्सव
आर्णी : शत्रूनेही आपला आदर करावा असे वर्तन शिवाजी महाराजांचे होते. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, असे प्रतिपादन अभियंता चंद्रशेखर शिखरे यांनी केले. ते मराठा सेवा संघाच्यावतीने गुरुवारी आर्णी येथील म.द. भारती महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शिवजयंती उत्सवात बोलत होते.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून जीवन पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू तोडसाम, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, नगरपरिषद उपाध्यक्ष नीता ठाकरे, पप्पू पाटील भोयर, अनंता गावंडे, राजू वीरखेडे, विशाल देशमुख, प्रल्हाद जगताप, माधव जाधव, शेषराव डोंगरे, बाळासाहेब चावरे, राजू बुटले, विवेक ठाकरे, अशोक घाडगे, महेश बुटले आदींची उपस्थिती होती.
शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात आपले स्वराज्य अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेवून उभे केले. यात त्यांनी जात-पात पाहिली नाही. महिलांचा नेहमी सन्मान केला. ती आपली असो वा शत्रूची परस्त्रीला नेहमी आईचा दर्जा दिला. शिवाजी महाराजांनी विविध भाषाही आत्मसात केल्या होत्या. त्याचप्रमाणे आपणसुद्धा विविध बाबी कशा आत्मसात करता येईल हे पाहायला पाहिजे. आजच्या काळात रोजगारासाठी तरी हे गुण कामात पडतील. महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये विविध जातीधर्मांचे लोक होते. आज जवळपास ३७५ वर्षे झाली तरी आपण मी या जातीचा, मी त्या जातीचा, हे काम माझे नाही या अहंकारात राहतो. कोणतेही काम कमी दर्जाचे नसते, हे महाराजांच्या काळात दिसून आल्याचे ते म्हणाले. (शहर प्रतिनिधी)