शिवसेनेचे संजय राठोड अखेर कॅबिनेट मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 05:00 AM2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:04+5:30

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांना बढती देण्याची शिवसैनिकांची मागणी होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून सामान्य शिवसैनिकांची इच्छापूर्ती करीत त्यांच्या मागणीचा यथोचित सन्मान केला. संजय राठोड हे जिल्ह्यातून एकमेव मंत्री आहेत. शिवाय शिवसेनेचे विदर्भातील ते एकमेव मंत्री असतील. गेल्या सरकारमध्येसुद्धा ते शिवसेनेकडून मंत्रिमंडळात विदर्भातून एकमेव चेहरा होते.

Shiv Sena's Sanjay Rathod is the cabinet minister | शिवसेनेचे संजय राठोड अखेर कॅबिनेट मंत्री

शिवसेनेचे संजय राठोड अखेर कॅबिनेट मंत्री

googlenewsNext
ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारमध्ये मिळाली बढती : विदर्भातून सेनेचे दुसऱ्यांदा एकमेव मंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिग्रस मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेले शिवसेनेचे संजय दुलीचंद राठोड यांनी सोमवारी अखेर राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. संजय राठोड यांची मंत्रिमंडळात बढतीवर वर्णी लागल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळते.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांना बढती देण्याची शिवसैनिकांची मागणी होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून सामान्य शिवसैनिकांची इच्छापूर्ती करीत त्यांच्या मागणीचा यथोचित सन्मान केला. संजय राठोड हे जिल्ह्यातून एकमेव मंत्री आहेत. शिवाय शिवसेनेचे विदर्भातील ते एकमेव मंत्री असतील. गेल्या सरकारमध्येसुद्धा ते शिवसेनेकडून मंत्रिमंडळात विदर्भातून एकमेव चेहरा होते.
सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार असल्याने संभाव्य चेहऱ्यांना रविवारी सायंकाळीच शपथविधीसाठी तयार राहण्याबाबतचे फोन कॉल्स आले. परंतु रात्री ११ वाजूनही संजय राठोड यांना ‘मातोश्री’वरून कोणताही कॉल नसल्याने त्यांच्या समर्थकांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. परंतु अखेर रात्री १ वाजता संजय राठोड यांना शपथविधीसाठी राजभवनात पोहोचण्याचे निमंत्रण मिळाले आणि शिवसैनिकांचा जीव भांड्यात पडला. संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून सोमवारी शपथ घेताच यवतमाळात शिवसैनिकांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. त्यांच्या येथील निवासस्थानासमोरही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
संजय राठोड यांच्या निमित्ताने जिल्हा शिवसेनेत पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांनाच मिळावे ही शिवसैनिकांची मनिषा आहे. संजय राठोड यांच्याकडे आता नेमके कोणते खाते दिले जाते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वने व पर्यावरण, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क यापैकी एखादे खाते ना. राठोड यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शपथविधी सोहळ्याला संजय राठोड यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने राजभवनात उपस्थित होते. जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहे. तर शिवसेनेचा एकमेव आमदार आणि तेही कॅबिनेट मंत्री असल्याने भाजपला रोखण्याची आणि शिवसेना आणखी तळागाळापर्यंत पोहोचविण्याची, पक्षाचा विस्तार व संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत करण्याची अपेक्षा संजय राठोड यांच्याकडून शिवसैनिकांना आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे विदर्भाचे नेतृत्व करण्याची संधी संजय राठोड यांच्याकडे चालून आली आहे. फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते.परंतु नंतर त्यांच्याकडून हे पद काढून भाजपकडे दिले गेले. जिल्ह्याचे पालकमंत्री पद पुन्हा मिळविण्यासाठी त्यांनी गेल्या सरकारमध्ये बरेच प्रयत्न केले, मात्र यश आले नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पुन्हा संजय राठोड अर्थात शिवेसेनकडे येण्याची स्थिती आहे. पालकमंत्री पद मिळाल्यास शिवसेनेकडून संधी मिळेल तिथे भाजपला चेकमेट दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्याचे दोन मंत्रिपदांचे नुकसान
मतदारांनी दिलेल्या कौलनुसार राज्यात ठरल्याप्रमाणे भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले असते तर जिल्ह्यात किमान तीन मंत्रीपदे मिळाली असती. त्यात दोन भाजपची व एक शिवसेनेचे मंत्री असते. परंतु शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्याचे दोन मंत्रीपदांचे नुकसान झाले आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये भाजपकडून प्राचार्य डॉ. अशोक उईके व मदन येरावार तर शिवसेनेकडून संजय राठोड हे मंत्री होते. जुन्या सरकारमध्ये एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्री असा वाटा होता. भाजप-सेनेचे नवे सरकार बसले असते तर त्यात निश्चितच मदन येरावार व संजय राठोड यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली असते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये संजय राठोड यांना कॅबिनेट पदी बढती मिळाली असली तरी मंत्रिमंडळातील जिल्ह्याच्या दोन जागा मात्र कमी झाल्या आहेत.

Web Title: Shiv Sena's Sanjay Rathod is the cabinet minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.