शिवसेना तालुका प्रमुखाने पाच लाखांची खंडणी मागितली
By Admin | Updated: July 2, 2015 02:55 IST2015-07-02T02:55:08+5:302015-07-02T02:55:08+5:30
पाच लाख रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्यावरून येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला शिवसेनेचे तालुका प्रमुख, संघटक व इतरांनी मारहाण केली.

शिवसेना तालुका प्रमुखाने पाच लाखांची खंडणी मागितली
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास मारहाण : संघटकासह सात अटकेत
घाटंजी : पाच लाख रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्यावरून येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला शिवसेनेचे तालुका प्रमुख, संघटक व इतरांनी मारहाण केली. या प्रकरणी खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींमध्ये शिवसेनेचे घाटंजी तालुका प्रमुख विजय कोंडलवार (रा. राजूरवाडी पांढरकवडा), संघटक नीलेश चव्हाण (रा.मुरली बंदरपोड), मनोज मोगरे, कैलास कुमरे, शंकर मोगरे, नितेश कुमरे, रामदास मोगरे यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि ३८४, ३९५, ३६३, ३५४, ३३२, ४२७, ३४१, ३२५ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सातही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वन परिक्षेत्र अधिकारी पी.एम.घटाळे यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा हात आणि पाय फ्रॅक्चर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली आणि तपासाबाबत पोलिसांना टीप्स् दिल्या.
पोलीस सूत्रानुसार, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आरएफओ घटाळे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. मात्र ही रक्कम न दिल्याने मारहाणीची ही घटना घडली. घाटंजी-पारवा रोडवरील इंझाळा नर्सरीमध्ये बुधवारी सकाळी १० वाजता आरएफओ घटाळे यांना मारहाण करून त्यांच्याकडील दहा हजार रुपये रोख व मोबाईल हिसकावून नेण्यात आला. यावेळी मध्यस्थीसाठी गेलेल्या महिला वनरक्षकाचा विनयभंग करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)