शिवसेना निश्चिंत, भाजपा चिंतेत
By Admin | Updated: December 3, 2014 22:56 IST2014-12-03T22:56:43+5:302014-12-03T22:56:43+5:30
राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह पहायला मिळत असला तरी भाजपाच्या गोटात मात्र यवतमाळसह अनेक जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे.

शिवसेना निश्चिंत, भाजपा चिंतेत
मंत्रिपदासाठी रस्सीखेच : संजय राठोड यांचा मार्ग सुकर, मदन येरावारांबाबत साशंकता
यवतमाळ : राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह पहायला मिळत असला तरी भाजपाच्या गोटात मात्र यवतमाळसह अनेक जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. कारण भाजपाचे अनेक आमदार मंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले जाण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनेने सत्तेत सहभागी होण्याची तयारी दर्शवून राज्यातील फडणवीस सरकारची अस्थिरता दूर केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये ४४ मंत्री होते. मात्र आपल्या सरकारमध्ये मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त ३३-३४ राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केले आहे. भाजपाने मंत्र्यांच्या दहा जागा शपथविधीच्या वेळी भरल्या. आता आणखी २० जागांचा विस्तार होणार आहे. त्यातील १२ जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत. त्यात पाच कॅबिनेट व सात राज्यमंत्री पदाचा समावेश आहे. या विस्तारात भाजपाच्या वाट्याला केवळ आठ जागा येणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस-दारव्हा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड तिसऱ्यांदा निवडून आले आहे. त्यांचे महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य आहे. शिवसेना सत्तेत सहभागी होणार असल्याने संजय राठोड यांचे मंत्री पदासाठी नाव निश्चित आहे. कारण पश्चिम विदर्भात शिवसेनेचे ते एकमेव ज्येष्ठ, आक्रमक व दीर्घ अनुभवी आमदार आहेत. त्यांना आता कॅबिनेट मंत्रीपद मिळते की राज्यमंत्रीपद याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या वाट्याला कॅबिनेटच्या पाचच जागा असून दिग्गजांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे राज्यमंत्री पदावर राठोड यांना समाधान मानावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कॅबिनेट मिळावे म्हणून राठोड प्रयत्नरत आहेत.
भाजपाकडून मदन येरावार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्याशिवाय आर्णीचे आमदार राजू तोडसाम हे आपले राजकीय गॉडफादर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यामार्फत मंत्रीपदासाठी फिल्डींग लावून आहेत. मात्र भाजपाच्या वाट्याला केवळ आठ जागा येणार आहे. मंत्रीपदाच्या शर्यतीतील दिग्गजांची संख्या बरीच मोठी असल्याने आठ जागांवर कुणाकुणाला सामावून घ्यावे, असा पेच पक्षश्रेष्ठींपुढे निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ही प्रमुख दोन पदे विदर्भाकडे असल्याने या विस्तारात एखाद-दोन मंत्रीपदे विदर्भाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येरावार यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. त्यातच राजू तोडसाम यांचे आव्हानही येरावार यांच्यापुढे कायम आहे. भाजपाच्या वाट्याला १४ मंत्रीपदे आल्यास येरावार यांची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. अशोक उईके, राजेंद्र नजरधने आणि अनपेक्षितरीत्या निवडून आलेले संजीवरेड्डी बोदकुरवार हेसुद्धा मंत्रीपदासाठी इच्छुक असले तरी त्यांना संधी मिळण्याची शक्यता नगन्य आहे. याची जाणीव असल्याने त्यांनी मंडळ-महामंडळांवर वर्णी लावण्यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्याला शिवाजीराव मोघे, मनोहरराव नाईक, वसंतराव पुरके यांच्या रुपाने तीन लालदिवे मिळाले होते. मात्र भाजपा सरकारमध्ये जिल्ह्याचे या दिव्यांच्या बाबतीत नुकसान होताना दिसत आहे. सध्या तरी संजय राठोड यांच्या माध्यमातून जिल्ह्याला एकच लालदिवा निश्चित दिसतो आहे.
दुसऱ्या दिव्यासाठी मदन येरावार, राजू तोडसाम यांच्यात संघर्ष असला तरी मुळात भाजपाकडून जिल्ह्याला लालदिवा मिळणार की नाही याचीच शाश्वती नाही. शिवसेनेचे सत्तेत सहभागी होणे सरकारसाठी दिलासादायक असले तरी यवतमाळ जिल्ह्यातील मंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या भाजपा नेत्यांसाठी मात्र अप्रत्यक्ष नुकसानकारक ठरले आहे. शिवसेनेच्या आगमनाने भाजपाच्या आमदाराचा मंत्रीपदाचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)