शिवसेना उमेदवारासाठी पैसे वाटपाची तक्रार
By Admin | Updated: February 16, 2017 00:08 IST2017-02-16T00:08:34+5:302017-02-16T00:08:34+5:30
जिल्हा परिषदेचे जोडमोहा-डोंगरखर्डा गटातील शिवसेनेचे उमेदवार विजय राठोड यांच्यासाठी अंतरगाव येथे पैसे वाटल्याची तक्रार

शिवसेना उमेदवारासाठी पैसे वाटपाची तक्रार
व्हिडिओ व्हायरल : अंतरगाव येथील प्रकार
कळंब : जिल्हा परिषदेचे जोडमोहा-डोंगरखर्डा गटातील शिवसेनेचे उमेदवार विजय राठोड यांच्यासाठी अंतरगाव येथे पैसे वाटल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी साम, दाम, दंड, नीती, भेद आदींचा अवलंब केला जात आहे. यातूनच तालुक्यातील अंतरगाव (पोड) येथे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शिवसेना उमेदवार विजय दुलीचंद राठोड यांच्या प्रचारार्थ सुदाम पवार (किन्हाळा) यांनी मतदारांना भरचौकात पैसे वाटल्याची तक्रार सदानंद दिलीप बोरेकार रा. अंतरगाव यांनी केली आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
यासंबंधीचा पुरावा आपल्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, ही तक्रार प्राप्त होताच निवडणूक विभागाचे पथक घटनास्थळी अंतरगाव (पोड) येथे रवाना झाले आहे. हे पथक तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करीत आहे. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. शिवसेना उमेदवार विजय राठोड हे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे बंधू आहेत. (तालुका प्रतिनिधी)