शिदोरी घेऊन बँकेच्या रांगेत
By Admin | Updated: November 13, 2016 00:18 IST2016-11-13T00:18:56+5:302016-11-13T00:18:56+5:30
पाचशे व हजाराच्या नोटा रद्द होताच जिल्ह्याने २०० कोटींच्या चिल्लर चलनाची मागणी आरबीआयकडे केली.

शिदोरी घेऊन बँकेच्या रांगेत
ग्रामीण नागरिकांची ‘नोटा वारी’ : चिल्लरसाठी भिक्षुकांना चहा-पाणी
यवतमाळ : पाचशे व हजाराच्या नोटा रद्द होताच जिल्ह्याने २०० कोटींच्या चिल्लर चलनाची मागणी आरबीआयकडे केली. मात्र, पाहीजे त्या प्रमाणात चलन मिळाले नाही. परिणामी ग्राहकांना नोटांसाठी दररोज बँकेची वारी करावी लागत आहे. गावाकडचे लोक तर पहाटेपासून शिदोरी घेऊन बँक गाठत आहे. काही जण तर जोडीने येऊन रांगेतला नंबर टिकवित आहे. कधी नव्हे ते, चिल्लर मिळण्याच्या आशेने भिखाऱ्यांचेही काही दुकानदार स्वागत करताना दिसले.
गेल्या तीन दिवसात जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँक शाखा, ग्रामीण बँक आणि खासगी बँकांमध्ये ३५० कोटी रूपयांचे चलन जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने विड्रॉलरूपात फार कमी पैसे सर्वसामान्यांच्या हाती पडले. चलनाअभावी काही बँकांमध्ये चार हजार रूपयांचेच विड्रॉल भरण्याच्या सूचना झाल्या. प्रत्यक्षात वेळेपर्यंत एक ते दोन हजार रूपये विड्रॉल रूपात मिळाले. नागरिकांना शनिवारी पुन्हा रांगेतच राहावे लागले. शनिवारी सुटी असल्याने शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात बँकेत पोहोचले. बँकेतही जागा उरली नाही. रांगा रस्त्यावर आल्या. काही बँकांनी ग्राहकांसाठी मंडपाची आणि पाण्याची व्यवस्था केली होती. गावाकडच्या नागरिकांनी सकाळपासूनच रांगेत नंबर लावले. विशेष म्हणजे, हे लोक सोबत भाकरी घेऊनच आले होते. काही जण जोडीने आले होते. एक थकला तर दुसरा तयार, अशा पद्धतीन नंबर लागले. बँकांपुढील मंडपात दुपारी शिदोरी घेऊन जेवणारे ग्राहक पाहायला मिळाले. तर काही माता आणि शिशूही दिवसभर रांगेत होते.
बँक कर्मचाऱ्यांच्या वर्तनातही बदल दिसला. छोट्याशा कारणाने ग्राहकांवर ओरडणारे कर्मचारी गत तीन दिवसांपासून दिवसरात्र डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. कामाचा ताण असला तरी शांत डोक्याने काम करीत आहे. सर्वांना प्रत्येक विषय समजावून सांगत आहेत. एरवी दुकानात आणि घरापुढे भिकारी आला की, त्याला हाकलून दिले जाते. मात्र सध्या भिक्षेकऱ्यांना सर्वाधिक मान मिळत आहे. त्यांच्याजवळ असलेली चिल्लर पाहून त्यांचे स्वागत केले जात आहे. इतकेच नव्हेतर चहा आणि नास्ताही दिला जात आहे.
चेकबुकने वाढला गोंधळ
एटीएममधील पैसे काही तासात संपले. रांगेतल्या अर्ध्या लोकांना पैसे न घेताच रिकाम्या हाताने परतावे लागले. बँकांच्या रांगेत उभे राहावे लागले. ज्यांच्याकडे एटीएम आहे अशा ग्राहकांना चेक जमा करणे बंधनकारक आहे. एका चेकबुकमध्ये मोजकेच चेक असल्याने अनेकांचे चेकबुक संपले. त्यामुळे नवाच गोंधळ निर्माण झाला.
मक्का मदिनाचा प्रवास प्रभावीत
मक्का मदिना या धार्मिक स्थळी जाण्यासाठी आतापासूनच बुकिंग करावे लागते. यासोबत प्रवासासाठी लागणारे साहित्य आधीच खरेदी करावे लागते. नोटा बंदीने हा प्रवास अडचणीत सापडला आहे. यामुळे यात्रेस जाणाऱ्या ग्राहकांनी बँक व्यवस्थापकांपुढे व्यथा मांडली. मात्र या चर्चेतून काहीच तोडगा निघाला नाही. (शहर वार्ताहर)