दोन औताचा कास्तकार धुंडाळतोय आसरा

By Admin | Updated: September 13, 2016 02:03 IST2016-09-13T02:03:46+5:302016-09-13T02:03:46+5:30

दोन औताचा कास्तकार म्हणजे गावातली बडी असामी. काही दिवसांपूर्वी ही श्रीमंती भोगणारा एक वृद्ध शेतकरी आज

The shelter of two pieces | दोन औताचा कास्तकार धुंडाळतोय आसरा

दोन औताचा कास्तकार धुंडाळतोय आसरा

उत्तरवाढोण्यातून प्रश्नांचा जन्म : एकुलत्या एक चिरंजीवाने हाकलून लावले, भावाचाही दगा
अविनाश साबापुरे ल्ल यवतमाळ

दोन औताचा कास्तकार म्हणजे गावातली बडी असामी. काही दिवसांपूर्वी ही श्रीमंती भोगणारा एक वृद्ध शेतकरी आज देशोधडीला लागला. ‘‘बाबू काई बी छापजो.. पन मले येकांदं बलांकेट आनून देजो गा.. भाये हिव लागते.’’ अशी विनवणी करत एखाद्या वृद्धाश्रमात जाण्यासाठी धडपडत आहे. गेल्या आठ दिवसांपासून शासकीय रुग्णालयाच्या परिसरात भणंग जीवन जगणाऱ्या या कास्तकाराचे नाव अनंतराव.
वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे. अंगावरच्या धोतराचे लक्तर झालेले. शर्ट मळून काळाकुट्ट झालेला. पिवळट पांढरी झालेली दाढी वाढून त्रासदायक बनलेली. येथील जिल्हा रुग्णालयात बराचवेळ पहुडलेला मलूल देह अचानक हालचाल करू लागला. दाढी खाजवत ‘मले येकांदी पोई भेटन तं बरं होईन’ म्हणाला. एका पोळीसाठी लाचार झालेला हा ज्येष्ठ व्यक्ती एकेकाळी २० एकर वावरात कष्ट करीत होता, हे समजताच आजूबाजूच्या लोकांना जरा अचंबा वाटला. पण अनंतराव यांनी आपली कर्मकहाणी मांडली तेव्हा साऱ्यांचा विश्वास बसला. कुणी दहा-वीस रुपयांची नोट त्यांच्या हाती ठेवली. एकाने चहावाल्याला आवाज दिला. चहा पिल्यावर अनंतराव जरा ग्लानी झटकून बोलू लागले. ‘‘उत्तरवाढोण्यात २० एक्कर वावर होतं. पन भावानं सारं विकून टाकलं. चार दोन हजार मले देल्ले. थे कवाचेच सरून गेले. एकुलतं एक पोरगं हाये. थेबी तिकडे फुलसावंगीकडं निंगून गेलं. गावात आता महा घर नाई नं दार नाई...’’
उत्तरवाढोणा नावाच्या गावातून अनेक भावनिक प्रश्नांचा गुंता घेऊन या वृद्धाने महिनाभरापूर्वी गाव सोडले. कधीही न परतण्यासाठी. गाठीशी पैसा नव्हताच. लासिन्यात पायी जाऊन ‘अगनगाडी’ धरली. शकुंतलेत विनातिकिट बसून यवतमाळ गाठले. अनेक दिवस बसस्थानकावर राहिले. गर्दीत कुणी आपल्याला ओळखत नाही, दिसेल त्याला दहा-वीस रूपये मागायचे आणि जमेल ते खायचे. काळोख दाटल्यावर तिथेच अंग टाकून डोळे मिटायचे. हा नित्यक्रम बनला. एक दिवस कुणी तरी वृद्धाश्रमात जाण्याचा सल्ला दिला. ‘‘गोधनी रोडवरच्या वृद्धाश्रमात गेलतो. पन त्याहीनं मले घेतलंस नाई.’’ वृद्धाश्रमातूनही नकार मिळाल्यावर अनंतराव पुन्हा बसस्थानकाच्या आश्रयाला आले. पण एक दिवस तिथेही कुणीतरी त्यांना मारहाण केली. मग पुन्हा एका अनोळखी गर्दीच्या ठिकाणाचा शोध सुरू झाला. जिल्हा रूग्णालय गाठले.
गेल्या आठ दिवसांपासून ते रुग्णालयाच्या परिसरात राहात आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी कुठे भाकरी सोडलेली दिसली की, एखादा तुकडा मागायचा. पाण्याचे दोन घोट रिचवायचे अन् आडोशाला निपचित पडून राहायचे. सोमवारी त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओरडून ओरडून आपली कहाणी सांगितली. ‘‘अरे का राजेहो नुसते पाह्यत राह्यता? थ्या वृद्धाश्रमवाल्यायले सांगा. मले घेऊन जा म्हना. नाईकन तं मी इथीसा मरन...’’

Web Title: The shelter of two pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.