‘ती’ हत्या जादूटोण्याच्या संशयातून

By Admin | Updated: May 3, 2015 00:09 IST2015-05-03T00:09:22+5:302015-05-03T00:09:22+5:30

उमरखेड तालुक्यातील तरोडा येथील अंगणवाडी सेविकेची हत्या जादूटोण्याच्या संशयातून झाल्याचे पुढे आले असून ..

'She' murdered by the suspicion of witchcraft | ‘ती’ हत्या जादूटोण्याच्या संशयातून

‘ती’ हत्या जादूटोण्याच्या संशयातून

अंगणवाडी सेविकेच्या खुनाचे प्रकरण : प्रेतासह नागरिकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
पोफाळी : उमरखेड तालुक्यातील तरोडा येथील अंगणवाडी सेविकेची हत्या जादूटोण्याच्या संशयातून झाल्याचे पुढे आले असून या प्रकरणी मृत महिलेच्या दिरासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी संतप्त नागरिक प्रेतासह पोफाळी पोलीस ठाण्यावर धडकले.
उमरखेड तालुक्यातील सुनंदा विजय धबाले (४५) हिची शुक्रवारी सकाळी ९ वाजता कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली होती. या घटनेने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान उशिरा रात्री या प्रकरणी किशोर अर्जुन धबाले (३५) याने तक्रार दिली. त्यावरून पोफाळी पोलिसांनी आरोपी जयानंद अर्जून धबाले (४५), त्याची पत्नी आशाबाई जयानंद धबाले, मुलगा किरण जयानंद धबाले, मुलगा निरंजन दयानंद धबाले या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनंदा आणि आरोपी जयानंद यांची घरे अगदी लागूनच असून जयानंद नेहमी सुनंदावर जादूटोणा करीत असल्याचा आरोप करीत होते. यातून नेहमी वादही होत होते. याच वादात शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुनंदावर कुऱ्हाडीने घाव घालण्यात आले. यात ती गंभीर जखमी झाली. नागरिकांनी तिला तत्काळ नांदेड येथे उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. सुनंदाचे सर्व नातेवाईक सोबत असल्याने उशिरा रात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात कुणीही तक्रार देण्यास आले नाही. आरोपींच्या अटकेची मागणी करीत संतप्त नागरिक पोफाळी पोलीस ठाण्यावर पोहोचले. सकाळी ६ वाजतापासून १० वाजेपर्यंत या ठिकाणी प्रेतासह ठिय्या दिला. पोफाळीचे ठाणेदार रजेवर असल्याने प्रभार उमरखेड येथील एपीआय अडिकर यांच्याकडे आहे. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील यांनी पोफाळी पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर शनिवारी सकाळी ८ वाजता आरोपी जयानंदला अटक करण्यात आली. (वार्ताहर)

तरोडा गाव हळहळले, आरोपी दिरास अटक
अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या सुनंदा धबाले हिच्या पतीचा मृत्यू २० वर्षापूर्वी झाला होता. पतीच्या निधनानंतर दोन मुली आणि दोन मुलांचा सांभाळ केला. दोनही मुलींचे लग्न लावून दिले. उदरनिर्वाहासाठी ती अंगणवाडीवर सेविका म्हणून काम करीत होती. अशा परिस्थितीतही अगदी तुटपुंज्या पैशात ती मुलांचे शिक्षण पूर्ण करीत होती. मोठा मुलगा भारतीय सैन्य दलात दाखल झाला असून तो पुणे येथे प्रशिक्षण घेत आहे. तर दुसरा मुलगाही पुणे येथे राहून सैन्यात जाण्याची तयारी करीत आहे. तिचा दीरच जादूटोणा करीत असल्याचा संशय घेत होता. यातूनच वाद होत होता. या हत्येनंतर संपूर्ण तरोडा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: 'She' murdered by the suspicion of witchcraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.