शकुंतला बंद
By Admin | Updated: August 3, 2014 23:37 IST2014-08-03T23:37:06+5:302014-08-03T23:37:06+5:30
शतकाचा इतिहास असलेली आणि सर्वसामान्यांचा गरीबरथ ठरलेली शकुंतला अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. क्लिक अॅन्ड निक्सन कंपनीसोबत असलेला करार संपल्याने शकुंतला यवतमाळकरांवर रुसली आहे.

शकुंतला बंद
करार संपला : रेल्वे प्रशासनाने लावली सूचना, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
शतकाचा इतिहास असलेली आणि सर्वसामान्यांचा गरीबरथ ठरलेली शकुंतला अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. क्लिक अॅन्ड निक्सन कंपनीसोबत असलेला करार संपल्याने शकुंतला यवतमाळकरांवर रुसली आहे. गतवर्षीही शकुंतला बंद झाली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला आणि शकुंतला धावायला लागली. मात्र आता दहा दिवस झाले तरी कोणत्याही लोकप्रतिनिधीने अद्यापपर्यंत आवाज उठविला नाही.
ब्रिटीश काळापासून यवतमाळ ते मूर्तीजापूर नॅरोगेज रेल्वे आहे. या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेला लोकांनी प्रेमाने शकुंतला हे नाव दिले. वऱ्हाडात पिकणारे पांढरे सोने इंग्लडमध्ये घेऊन जाण्यासाठी १९१२ मध्ये क्लिक अॅन्ड निक्सन कंपनीने रेल्वे सुरू केली. यासाठी ब्रिटीश कंपनीने १०० वर्षाचा करार केला होता.
त्यावेळी एका दिवसाला एक हजार रुपये किंवा महिन्याला २५ हजार रुपये यावर खर्च करण्याचा करारही झाला होता. यवतमाळ ते मूर्तीजापूर हा ११३ किलोमीटरचा नॅरोगेज लोहमार्ग आहे. आजतागायत शकुंतला यवतमाळ ते मूर्तीजापूर दिवसातून एकदा आपल्याच डौलाने धावत होती. मात्र २४ जुलैपासून शकुंतला अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. तशी सूचना यवतमाळच्या रेल्वे स्थानकावर लावण्यात आली आहे.
१०० वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या या लोहमार्गाची गत ६० वर्षात कोणतीही दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे हा मार्ग आता धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळेच रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. तसेच आर्थिक कारणही पुढे केले जात आहे. गतवर्षी शकुंतला बंद झाली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला. आंदोलन केले. त्यानंतर शकुंतला पुन्हा धावायला लागली. रेल्वे सुरू करण्यासाठी लोहमार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. परंतु लागणारा पैसा आणायचा कोठून असा प्रश्न आहे.