राज्यभरातील युवक करणार चार दिवस श्रमदान
By Admin | Updated: May 10, 2015 01:47 IST2015-05-10T01:47:57+5:302015-05-10T01:47:57+5:30
यवतमाळकरांची तहान भागविणारा निळोणा प्रकल्प पुनर्जीवित करण्याचे काम ‘प्रयास’च्या माध्यमातून हाती घेण्यात आले.

राज्यभरातील युवक करणार चार दिवस श्रमदान
यवतमाळ : यवतमाळकरांची तहान भागविणारा निळोणा प्रकल्प पुनर्जीवित करण्याचे काम ‘प्रयास’च्या माध्यमातून हाती घेण्यात आले. लोकसहभागाचे हे मोठे उदाहरण आहे. राज्यातील युवक या प्रकल्पासाठी १७ मे पर्यंत श्रमदान करणार आहे. मुख्यमंत्रीही या प्रकल्पाची पाहणी करणार असल्याचे व्हीसीतून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती शनिवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेला प्राधान्य दिले आहे. पाणी टंचाईचा प्रश्न या माध्यमातून निकाली काढला जाणार आहे. याच काळात निळोणा प्रकल्पातून गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता लोकसहभाग मिळाला आहे. आतापर्यंत साडेसहा हजार ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला. वर्षभरात ५० हजार ट्रॅक्टर गाळ काढला जाणार आहे. पाच वर्षात पाच लाख ट्रॅक्टर गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ही मोहीम मोठी आहे. अविरत चालणार आहे. यातून काहीअंशी काम झाले आहे. यासाठी राज्य शासनही मदत करीत आहे. लोकसहभागही मिळत आहे. ४३ वर्षांपासून साचलेला गाळ काढल्यास यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे यवतमाळकरांनी हा प्रकल्प आपला समजून श्रमदानासाठी पुढे यावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली. सोबतच या प्रकल्प क्षेत्रातील १५ गावातील शेतकऱ्यांना गाळ नेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. हा गाळ सुपिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी याचा वापर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. राज्यभरातील युवक १४ ते १७ मे या कालावधीत सदर उपक्रमात श्रमदान करणार आहेत. यवतमाळकरांनी श्रमदानात सहभागी व्हावे, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर, समदूरकर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, कमल बागडी, डॉ.अलोक गुप्ता, डॉ. कावलकर, प्रशांत बनगिनवार, सुरेश राठी, संदीप चिंतलवार, विजय देशपांडे, अविनाश शिर्के, मंगेश खुणे आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)