जावयाच्या खुनात मेहुण्याला सात वर्षे शिक्षा
By Admin | Updated: October 30, 2015 02:23 IST2015-10-30T02:23:15+5:302015-10-30T02:23:15+5:30
दुचाकी दिली नाही म्हणून मेहुण्याने रागाच्या भरात लासिना येथे जावयाचा खून केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.व्ही. सेदानी यांच्या न्यायालयाने ...

जावयाच्या खुनात मेहुण्याला सात वर्षे शिक्षा
लासिनाची घटना : दारव्हा सत्र न्यायालयाचा निकाल, वर्षभरापूर्वीचे प्रकरण
दारव्हा : दुचाकी दिली नाही म्हणून मेहुण्याने रागाच्या भरात लासिना येथे जावयाचा खून केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.व्ही. सेदानी यांच्या न्यायालयाने आरोपी मेहुण्याला सात वर्ष सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सुनील भगवान दाभेकर (२६) रा. लासिना असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. लाडखेड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लासिना येथे १३ जुलै २०१४ रोजी दुचाकी न दिल्याच्या कारणावरून चुलत मेहुणा सुनील दाभेकरने जावई संतोष विठ्ठल जांभेकर (३२) रा. सावर, ता. बाभूळगाव याला बेदम मारहाण केली. त्याला रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी नागपूर येथे नेले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
याप्रकरणी मृताची पत्नी देवमाला संतोष जांभेकर हिने दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी आरोपी सुनीलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले.
याप्रकरणी साक्षीपुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. के.व्ही. सेदानी यांनी आरोपीला सात वर्ष सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड़ अमोल राठोड यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)