दोन वनपालांसह सात जण निलंबित
By Admin | Updated: August 27, 2014 23:51 IST2014-08-27T23:51:22+5:302014-08-27T23:51:22+5:30
राखीव वनात शेकडो परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करीच्या प्रकरणात दोन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आता दोन क्षेत्रसहायकासह चौकीदार आणि वनरक्षक अशा

दोन वनपालांसह सात जण निलंबित
यवतमाळ : राखीव वनात शेकडो परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करीच्या प्रकरणात दोन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आता दोन क्षेत्रसहायकासह चौकीदार आणि वनरक्षक अशा सात जणांना यवतमाळ वनवृत्ताचे मुख्यवनसंरक्षक व्ही. व्ही. गुरमे यांनी तडकाफडकी निलंबित केले. यासंबंधीचे आदेश मंगळवारी सायंकाळी काढण्यात आले. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
मनपूरचे क्षेत्रसहायक जी. के. लुटे, वनरक्षक आर.डी. कुमरे, जी.पी.जाधव, चौकीदार आर.टी. ढबाले, साखराचे क्षेत्रसहायक शेख कय्यूम, वनरक्षक सोनटक्के आणि चौकीदाराचा निलंबनात समावेश आहे. हिवरी वन परिक्षेत्रातील मनपूर राऊंडमधील राखीव वनात शेकडो परिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून तस्करांनी कत्तल केली. कत्तलीतील लाखो रूपये किमतीचा लाकूडसाठा वाहून नेताना ट्रक फसल्याने तस्करांनी पोबारा केला. तत्पूर्वी मनपूर राऊंडमधूनच शेकडो सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी करण्यात आली. हाच प्रकार घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा बिटमध्येही झाला. या घटनेची शाही वाळते न् वाळते तोच पुसद वन परिक्षेत्रातील खंडाळा बिटमध्ये ट्रक फसल्याने सागवान लाकडाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला. या तिनही घटना गांर्भियाने घेत दोन दिवसांपूर्वी घाटंजी वन परिक्षेत्र अधिकारी आर.एन.मंचाळ आणि हिवरी वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एच. मोहीते यांना निलंबित करण्यात आले होते. (स्थानिक प्रतिनिधी)