दिग्रसमध्ये आणखी सात लाखांची रोकड जप्त
By Admin | Updated: November 12, 2016 01:37 IST2016-11-12T01:37:19+5:302016-11-12T01:37:19+5:30
येथील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही नाक्यांवर वाहनांची तपासणी मोहीम सुरू ठेवली आहे.

दिग्रसमध्ये आणखी सात लाखांची रोकड जप्त
महसूल प्रशासनाची कारवाई : नगरपरिषद निवडणुकीमुळे वाहनांची नाक्यावर तपासणी
दिग्रस : येथील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही नाक्यांवर वाहनांची तपासणी मोहीम सुरू ठेवली आहे. त्यात सात लाख २३ हजार रुपये जप्त करण्यात आले. गेल्या दोन दिवसातील हा आकडा सुमारे ४० लाखांवर पोहोचला आहे.
उपविभागीय निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर बागडे, सहायक अधिकारी शेषराव टाले, पोलीस पथकातील रणजित गायकवाड, अश्विन इंगळे यांनी ही कारवाई केली. दारव्हा मार्गावरील नाक्यावर विनायक रघुनाथ कुलकर्णी यांच्या वाहनात (एम.एच.३१-टीसी-५६५) तपासणीदरम्यान सात लाख २३ हजारांची रोकड आढळली. त्याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ती जप्त करण्यात आली. गुरुवारी चार वाहनातून ३२ लाख १८ हजार रुपये जप्त करण्यात आले होते. या कारवाईने रोकड वाहतूकदारात दहशत निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
अन्य सात नगरपरिषदांमध्ये तपासणीचा मुहूर्त केव्हा ?
दिग्रसच्या महसूल प्रशासनाने गेली दोन दिवस भरदिवसा वाहनांची अचानक तपासणी केल्याने सुमारे ४० लाखांंची रोकड हाती लागली. दिग्रसचे महसूल प्रशासन निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार रस्त्यावर उतरले असताना अन्य सात नगरपरिषदांमधील महसूल प्रशासन ढिम्म का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेथील महसूल प्रशासनाला वाहन तपासणीचा मुहूर्त केव्हा सापडणार असा प्रश्न विचारला जात आहे. दिग्रसचा अनुभव पाहता सर्वच नगरपरिषद क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोकडची वाहतूक वाहनांमधून केली जात असावी. मात्र अद्याप तेथे कारवाई सुरू न झाल्याने जणू नोटांच्या या वाहतुकीला मुभा मिळाली आहे. विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजार सर्वश्रृत आहे. त्यातही मोठी ‘उलाढाल’ होत आहे. मात्र तालुका महसूल प्रशासन अद्याप कार्यालयातच गुंतून असल्याने या ‘उलाढाली’चा पर्दाफाश होऊ शकलेला नाही.