संतोषसाठी सरसावली संवेदनशील मने
By Admin | Updated: May 15, 2017 00:59 IST2017-05-15T00:59:13+5:302017-05-15T00:59:13+5:30
‘दुनिया में इतना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो, मै अपना गम भुला गया’ या पंक्तितून

संतोषसाठी सरसावली संवेदनशील मने
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : ‘दुनिया में इतना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो, मै अपना गम भुला गया’ या पंक्तितून एका शायराने जीवनातील दु:खावर भाष्य केले. खरंच दिव्यांग संतोषकडे पाहिलं की आपले सर्व दु:ख विसरून जातो. संतोष आणि डोंगराएवढं दु:ख ही कहाणी सोशल मीडियावर सुनील आरेकर या युवकाच्या माध्यमातून व्हायरल झाली व संवेदनशील मने पुढे सरसावली.
दारव्हा येथील आर्ट आॅफ लिव्हींग परिवारातील सदस्य प्रा. प्रेम राठोड यांच्या पुढाकाराने संतोषच्या घरी दाखल झाले. राजेंद्र सोनोने, अॅड. आशीष वानखडे, रूपेश गोळे यांनी दिव्यांग संतोषला आर्थिक मदत करत दु:ख हलके करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय दारव्हा प्रहार संघटनेचे नरेश भोयर, आर्णीचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मुनगीनवार, विश्वास सवने, अरविंद गादेवार, महेश गांधी, रंजित झोंबाडे यांनीसुद्धा संतोषचे दु:ख कवेत घेण्याचा मनोदय व्यक्त केला.
कुऱ्हाड येथील संतोष रमेश बोराडे (२८) या युवकाच्या आयुष्यातील काटेरी क्षण अंतर्मुख करायला लावणारे आहे. तो ८० टक्के अपंग आहे. आई, वडील, दोन भाऊ, एक बहीणसोबत मजुरी करून उदरनिर्वाह करायचा. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने केवळ तिसरीपर्यंत शिक्षण घेवू शकला. दहा वर्षांपूर्वीचा आयुष्यातील घटनाक्रम काळीज चिरणारा आहे. लहान बहिणीला पिसाळलेल्या कुत्र्याचे चावा घेतला. तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिला घरी आणल्यावर भावंडे एकत्र भोजन करायचे. संतोषला संसर्ग होवू नये म्हणून डॉक्टरने संतोष व त्याचा मोठा भाऊ दामा यांना इंजेक्शन दिले. तेव्हा संतोषच्या छातीपासून शरीराच्या खालील भागाची हालचाल थांबली. त्याला कायमचे अपंगत्व आले. दुर्देवाने काही दिवसातच त्याची बहीण व भाऊ दामाचा मृत्यू झाला. त्याच्या आई-वडिलांना भविष्याची चिंता सतावत होती. आजारपणात तेही वारले. बोराडे कुटुंबात आता दिव्यांग संतोष, लहान भाऊ कृष्णा आणि त्यांच्या सोबतीला आभाळाएवढं दु:ख. स्वत:ला सावरत दोघा भावंडांनी नवीन आयुष्याला प्रारंभ केला. कृष्णा मोलमजुरी करून दिव्यांग भावाचे पालनपोषण करू लागला. संतोषला चालता-फिरता येत नाही. जेवताना घाससुद्धा भरवावा लागतो. कृष्णाच जणू त्याची माय बनला. कृष्णाचे दोन आठवड्यापूर्वी लग्न झाले. संतोष केवळ बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकतो. अपंग निराधार योजनेंतर्गत दरमहा ६०० रुपये त्याला मिळतात. २० किलोमीटर अंतरावरील कुऱ्हाडहून एखादा शेजारी त्याला घेवून दारव्हा येथे बँकेत येतो. अपंगांसाठी घरकूल मिळणार असल्याचे सांगितल्याने तो घरकुलाचं स्वप्न रंगवितोय. शासनाची मदत मिळाल्यास घरबसल्या एखादा व्यवसाय करून लहान भावाचा भार हलका करण्याचा संतोषचा दुर्दम्य आत्मविश्वास आयुष्यात नवी उमेद निर्माण करणारा आहे. अनेक सामाजिक संस्था तथा दानशूर व्यक्तींनी त्याच्या आयुष्यात नंदनवन फुलविण्याचा मनोदय व्यक्त केला.