दीड लाख नागरिकांची सुरक्षा ४६ पोलिसांवर
By Admin | Updated: May 23, 2015 00:15 IST2015-05-23T00:15:01+5:302015-05-23T00:15:01+5:30
आर्णी पोलीस ठाणे परिक्षेत्र ब वर्गात येत असून आर्णी शहरासह ८३ गावे या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतात. ....

दीड लाख नागरिकांची सुरक्षा ४६ पोलिसांवर
गुन्हेगारीत वाढ : पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण
राजेश कुशवाह आर्णी
आर्णी पोलीस ठाणे परिक्षेत्र ब वर्गात येत असून आर्णी शहरासह ८३ गावे या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतात. तालुक्याची लोकसंख्या दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. आर्णी पोलीस ठाण्यात एकूण ४६ कर्मचारी कार्यरत आहे. या ४६ कर्मचाऱ्यांच्या भरोशावर दीड लाख नागरिक आहेत. त्यामुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.
आर्णी पोलीस ठाण्यातील एकूण ४६ कर्मचाऱ्यांपैकी चार अधिकारी व चार महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्याचा विस्तार सहा बीटमध्ये विभागला आहे. आर्णी शहरात दोन बीट चार कर्मचारी, बोरगाव बीटमध्ये दोन कर्मचारी, जवळा बीटमध्ये तीन कर्मचारी, लोणी बीटमध्ये दोन कर्मचारी, महागावमध्ये दोन कर्मचारी अशा प्रकारे एकूण सहा बीटमध्ये १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी तीन कर्मचारी, गुन्हे विभागात तीन कर्मचारी, वायरलेसमध्ये दोन कर्मचारी व चालक म्हणून दोन कर्मचारी कार्यरत आहे. त्यानंतर दैनंदिन कामकाजासाठी केवळ सहा कर्मचारी उरतात. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचे विभाजन करण्यात आले आहे.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तालुक्यातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी ठाणेदाराला मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची अधिक पदे निर्माण करावी, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. आर्णी तालुका हा नक्षलग्रस्त असून शहरातून जाणारा राज्य महामार्ग क्र.७ मोठा वर्दळीचा आहे. त्यामुळे दुर्घटना ही सतत घडत असतात. यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासते. शहर व शहराबाहेरील पेट्रोलिंग, गस्त, नाकाबंदी आदींमध्ये कर्मचाऱ्यांचा नाकिनऊ येते. २०१० मध्ये १८७ गुन्हेगारीच्या घटना घडल्या होत्या. २०१४ मध्ये ५३४ तर २०१५ मध्ये भाग एक ते पाचमध्ये १६६ क्राईमच्या घटना घडल्या आहे.
आर्णी ठाणेदारांनी नवीन इमारत व वाढीव कर्मचाऱ्यांसाठी प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा आमदार ख्वाजा बेग यांच्यामार्फत करण्यात येत आहे. शहरातील रस्त्यांचे तथा विकासात्मक कामाचे नियोजन करण्यात येणार असल्याने आमदार ख्वाजा बेग यांनी आर्णी पोलिसांची बैठक घेऊन हा विषय चर्चिला होता. तालुक्याच्या जनतेच्या संरक्षणार्थ तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी वाढीव कर्मचाऱ्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन बेग यांनी दिले आहे.
'आमदारांच्या बैठकीत पोलीस समस्यांवर चर्चा
केवळ ४६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरोशावर तालुक्यातील दीड लाख नागरिकांची सुरक्षितता आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायसुद्धा वाढले आहे. ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून असताना लोकप्रतिनिधींनी याकडे कधीही लक्ष दिले नाही. गुन्हेगारी, अवैध प्रवासी वाहतूक, दारू व जुगाराचे प्रमाण, वरली मटका, भांडण तंटे आदींचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची नवीन पदे निर्मिती करणे आर्णी तालुक्यात अतिशय गरजेचे झाले आहे. याकडे विद्यमान लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.