दुसऱ्याही दिवशी ‘समृद्धी’कडे पाठ
By Admin | Updated: December 22, 2016 00:13 IST2016-12-22T00:13:26+5:302016-12-22T00:13:26+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आयोजित महिला बचत गटांच्या ‘समृद्धि’ प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरिवली आहे.

दुसऱ्याही दिवशी ‘समृद्धी’कडे पाठ
यवतमाळ : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आयोजित महिला बचत गटांच्या ‘समृद्धि’ प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरिवली आहे. केवळ जेवणाचे स्टॉल सायंकाळी गर्दीने खचाखच असल्याचे दिसून येत आहे.
महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा समावेश आहे. याअंतर्गत खास ‘उमेद’ कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. या यंत्रणेमार्फत महिलांना विविध प्रशिक्षण देण्याचीही व्यवस्था करण्यात आली. मात्र आत्तापर्यंत लाखो रूपये खर्च करूनही जिल्ह्यातील महिलांचे सक्षमीकरण नावापुरतेच दिसून येत आहे. केवळ महिला बचत गटांची स्थापना करून हा विभाग आपली कार्यकुशलता दर्शवित आहे.
ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत येथील पोस्टल ग्राउंडवर चार दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २३ डिसेंरपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. या प्रदर्शनात महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहे. मात्र बहुतांश बचत गटांनी पारंपारिक खाद्य पदार्थांची निर्मिती करून त्याचेच प्रदर्शन केले आहे. ग्रामीण व शहरी भागात हमखास आणि कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तूच या प्रदर्शनात बहुसंख्येने ठेवण्यात आल्या. बाजारात जी वस्तू कमी किमतीत आणि चांगल्या दर्जाची मिळते, ती वस्तू या प्रदर्शनातून कोण खरेदी करणार, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
या प्रदर्शनावर दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च करण्यात येतो. बचत गटातील सदस्यांची भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात येते. चार दिवस थोडीफार जत्रा भरते, एवढाच काय तो हेतू यातून साध्य होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रदर्शनातून खरच महिला बचत गटांची किती समृद्धि होते, त्यांना किती लाभ होतो, त्यांना खरच बाजारपेठ उपलब्ध होते काय, असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात. त्यामुळे या प्रदर्शनाचा नेमका हेतू तरी काय, असा प्रश्न पडतो. (शहर प्रतिनिधी)