वादळासह संततधार पावसाची हजेरी
By Admin | Updated: May 9, 2014 01:17 IST2014-05-09T01:17:52+5:302014-05-09T01:17:52+5:30
गेल्या काही दिवसांपासून तालुक्याला सतत वादळाचा तडाखा बसत असताना गुरुवारी दुपारी ३ वाजतापासून वादळासह संततधार पावसाने हजेरी लावली.

वादळासह संततधार पावसाची हजेरी
वणी : गेल्या काही दिवसांपासून तालुक्याला सतत वादळाचा तडाखा बसत असताना गुरुवारी दुपारी ३ वाजतापासून वादळासह संततधार पावसाने हजेरी लावली. वादळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवरील वर्दळ रोडावली. अनेकांनी आपली दुकानेही बंद केली होती.
गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात ढगाळी वातावरण आणि वादळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे हा उन्हाळा आहे, की पावसाळा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज वादळी पाऊस तालुक्यात कुठे ना कुठे हजेरी लावत आहे. तीन दिवसांपूर्वी मारेगावसह वणी तालुक्याला वादळाने तडाखा दिला होता. यात अनेक घरांवरील छत उडून गेले होते. हे वातावरण सतत कायम असतानाच गुरुवारी दुपारी ३ वाजतापासून वणीत वादळासह संततधार पावसाने हजेरी लावली.
गुरुवारी दुपारी विजांच्या प्रचंड कडकडाटात पावसाला सुरूवात झाली. जोराचा पाऊस आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. काही छोट्या व्यावसायीकांनी आपली दुकाने बंद करून घराचा रस्ता धरला. वादळी पावसाने वाहनधारकांची तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे वाहन चालविणे कठीण झाल्याने अनेक वाहनधारकांना आडोसा शोधावा लागला. ऑटोही जागच्या जागीच थांबून होते. जवळपास एक तास संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे सर्वच रस्ते ओस पडले होते.
या वादळी पावसाचा फुटपाथ व्यावसायीकांना चांगलाच तडाखा बसला. टिळक चौक परिसरातील काही फुटपाथ विक्रेत्यांची प्रचंड तारांबळ उडाली. दुकानासमोरील साहित्य ओले होऊ नये म्हणून त्यांना कसरत करावी लागली. यात साहित्य भिजल्याने त्यांचे काही प्रमाणात नुकसानही झाले. मात्र तालुक्यासह शहरात कुठेही मोठी हानी झाली नाही. मात्र विजांच्या कडकडाटाने नागरिक धास्तावले होते. भाजी विक्रेत्यांनाही वादळी पावसाचा तडाखा बसला.
गेल्या मंगळवारीही सायंकाळच्या सुमारास वादळाने हजेरी लावली होती. बुधवारीही ढगाळ वातावरणासह वादळाने हजेरी लावली. त्यानंतर आज गुरुवारी पुन्हा जोरदार वादळी पावसाचे आगमन झाले. गेल्या काही दिवसांत झालेल्या वादळाने वणी तालुक्यातील राजूर येथून भांदेवाडा देवस्थानकडे जाणार्या मार्गावरील गेल्या २0 वर्र्षांपासून उभ्या असलेल्या स्वागत कमानीचे नुकसान झाले. घरांवरील टिनपत्रेही उडून गेली. शेतात गोठय़ात ठेवलेला जनावरांचा चाराही ओला झाला. मारेगाव तालुक्यातील पिसगाव परिसरातही वादळाचा तडाखा बसला. तेथील एका शाळेचे छतच वादळाने उडाले. वणीत गुरुवारी सायंकाळपर्यंत पावसाळी वातावरण कायम होते. (कार्यालय प्रतिनिधी)