ऊर्जा राज्यमंत्र्यांशी ‘एसईए’ची चर्चा
By Admin | Updated: January 8, 2017 01:01 IST2017-01-08T01:01:09+5:302017-01-08T01:01:09+5:30
महावितरणचे मोहोळ (जि. सोलापूर) येथील उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून

ऊर्जा राज्यमंत्र्यांशी ‘एसईए’ची चर्चा
आंदोलनाची दखल : लवकरच कारवाईची दिली ग्वाही
यवतमाळ : महावितरणचे मोहोळ (जि. सोलापूर) येथील उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्र्यांनी शुक्रवारी धरणे मंडपाला भेट देत लगेच कारवाईची ग्वाही दिली.
यापूर्वी महावितरणच्या विविध विभागात प्रशासनाच्या जाचाला कंटाळून काहींनी आत्महत्या केल्याचे संघटनेने म्हटले आहे. पानसरे यांच्या आत्महत्येस कारणीभूत सोलापूरचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता (ग्रामीण) यांना तत्काळ निलंबित करावे, तिनही कंपनीतील वर्क नॉर्म्स ठरवावे, अभियंत्यांचे कामाचे तास निश्चित करावे, कर्मचाऱ्यांना लोकसेवकाचा दर्जा द्यावा, प्रशासनाकडून अभियंत्यांवर होणारी एकतर्फी कारवाई थांबवावी, आदी मागण्यांसाठी संघटनेने यवतमाळात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी शुक्रवारी ‘एसईए’च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी संघटनेच्या मागण्या जाणून घेतल्या. ना. फेरावार यांनी तत्काळ मुंबईतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मागण्यांबाबत त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिले. अभियंत्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सध्याच्या प्रणालीत सुधारणा करण्याची ग्वाहीसुद्धा ना. येरावार यांनी दिली. भविष्यात अभियंत्यांवर असे प्रसंग येणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी संघटनेचे सहसचिव विवेक राऊत, सर्कल सचिव प्रकाश कोळसे, विलास चेले, सुहास मेश्राम, अमोल मिरकुटे, आकाश जयसिंगपुरे, संजय राठोड आदींसह महावितरण व महापारेषणमधील अभियंते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)