अवैध नळ जोडण्यांवर शिक्कामोर्तब
By Admin | Updated: November 17, 2014 23:01 IST2014-11-17T23:01:53+5:302014-11-17T23:01:53+5:30
शहरात प्राधिकरणाच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या बाबीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जागरुक नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध वृत्तालाही खोडून काढण्याचा प्रयत्न

अवैध नळ जोडण्यांवर शिक्कामोर्तब
यवतमाळ : शहरात प्राधिकरणाच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या बाबीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जागरुक नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध वृत्तालाही खोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता बोलती बंद झाली आहे. अवैधरीत्या नळ जोडण्या घेतलेल्यांविरुद्ध फौजदारी कारवाईची धमकीही या विभागाने दिली आहे.
यवतमाळ शहर आणि लगतच्या ग्रामीण पंचायत क्षेत्राला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मोठमोठ्या पाईप लाईन टाकण्यात आल्या आहे. त्यावर छोट्या पाईप लाईनद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही लोकांनी मुख्य पाईप लाईन फोडून नळ जोडण्या घेतल्या आहे. या प्रकारात प्रामाणिकपणे पाणी घेणाऱ्यांवर अन्याय होत आहे. वाजवी पेक्षा आणि वापरा पेक्षा अधिक पाण्याचे बिल वसूल केले जात आहे. हा सर्व प्रकार पाणी चोरीच्या प्रकारातून होत आहे. ज्या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्या, तेथे तर हमखास पाण्याची चोरी होत आहे. काही लोकांनी जुन्याच पाईपलाईनवरून जोडण्या सुरू ठेवल्या आहे. यामुळे टाकीतून सोडले जाणारे पाणी आणि बिलाचा ताळमेळ बसत नव्हता. तरीही प्राधिकरण शहरात पाण्याची चोरी होत नाही, असे ठामपणे सांगत होते. मात्र आता प्राधिकरणानेच विनापरवानगी नळ जोडणी घेतल्याच्या बाबीवर मोहोर लावली आहे. एवढेच नाही तर रितसर अर्ज, मंजुरी आणि आवश्यक शुल्काचा भरणा करून जोडण्या वैध करण्याची संधीही देण्यात आली आहे. यासाठी १ डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत जोडण्या वैध न झाल्यास पूर्व सूचना न देता नळ जोडण्या बंद आणि फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. वास्तविक या बाबी प्राधिकरणाने यापूर्वीच करायला पाहिजे होत्या. उशिरा जाग आली असली तरी प्रत्यक्ष काय कारवाई होते याकडे लक्ष लागेल आहे. (वार्ताहर)