मूर्तिकारांनीच गणरायाला सोडले उघड्यावर
By Admin | Updated: September 7, 2016 01:39 IST2016-09-07T01:39:57+5:302016-09-07T01:39:57+5:30
कलेची उपासना करणारे कलावंत आपण पाहिले आहेत. कलेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते जीवाचे रान करतात.

मूर्तिकारांनीच गणरायाला सोडले उघड्यावर
यवतमाळ : कलेची उपासना करणारे कलावंत आपण पाहिले आहेत. कलेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते जीवाचे रान करतात. कलेलाच देवता मानणारे कारागीर आपल्या कलेला जिवंत रूप देऊन साऱ्यांचेच लक्ष वेधतात. यामुळे कलेचे वाट्टेल ते मोल देऊन कलाप्रेमी वस्तू खरेदी करतो. या केलेच्या क्षेत्रात जर व्यावसायिकतेने घुसखोरी केली तर कलेचे मोल शून्य होते. मग साक्षात ईश्वर पुढे असला तरी त्याला ओलांडून पुढे जाण्यास असे व्यावसायिक मागे-पुढे पाहात नाही. याचाच प्रत्यय गणशे चतुर्थीच्या अनुषंगाने यवतमाळकरांना आला. गणेश चतुर्थीचा दिवस संपताच गणरायाच्या मूर्ती विकल्या जाणार नाही. यामुळे व्यावसायिकांनी न विकल्या गेलेल्या मूर्ती उघड्यावर सोडून रात्रीतूनच पोबारा केला. आपल्या व्यावसायिक स्वार्थी वृत्तीचे यवतमाळकरांना दर्शन घडविले.
कारागिरांच्या नावावर व्यावसाय करणाऱ्या उद्योजकांची गर्दी अलीकडे वाढत आहे. यातून चार पैसे जास्त मिळतात. वर्षभर कुठलेही काम करावे लागत नाही. यामुळे या क्षेत्रात रस असणारे आणि रस नसणारे व्यावसायिक मूर्तिकार दिसतात. या मूर्तिकारांनी खोटे बोलण्याच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. यातून यवतमाळात मूर्तिकलेलाही गालबोट लागले आहे.
विघ्नहर्त्याला घडविण्यासाठी पुरेशी लाल माती मिळाली नाही. असे असले तरी प्रत्येक मूर्तिकार आपली मूर्ती लाल मातीची असल्याचे ठामपणे सांगत होता. तर काहींनी आपल्या गणरायाची मूर्ती शाडूमातीची असल्याची थाप गणेशभक्तांना मारली. हा त्यांचा खोटारडेपण धंद्यासाठी होता. याचे वास्तव गणेश स्थापनेनंतर काही तासातच उघड झाले.
अधिक नफा मिळवून व्यवसाय कॅश करण्यासाठी व्यावसायिक मूर्तिकारांनी लाल माती आणि शाडूमातीच्या नावाखाली प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती भक्ताच्या माथी मारल्या. या मूर्ती अधिक नाजूक होत्या. यामुळे त्याचा थोडासा धक्का लागला तरी त्याचे हात, बोट, चेहरा, पाय तुटला. ज्या मूर्ती खंडित होतात, अशा मूर्तीची स्थापना केली जात नाही. यामुळे भक्तांनी या मूर्ती खरेदी केल्या नाही. मुळात व्यावसाय करण्यासाठी बसलेल्या मूर्तिकारांनी अशा मूर्तीचे ओझे कुठे घेऊन जायचे म्हणून या मूर्ती उघड्यावर टाकल्या. त्या मूर्ती लाल मातीच्या नव्हत्या. तर पूर्णत: प्लास्टर आॅफ पॅरिसच्या होत्या. हे प्लास्टर आॅफ पॅरिस सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारे आहे. विशेष म्हणजे, हे प्लास्टर आॅफ पॅरिस पर्यावरणाला घातक आहे. यामुळे नागरिकांनी या मूर्तीच्या खरेदीवर बहिष्कार टाकला होता. परंतु मूर्तिकारांनी भोळ्या गणेशभक्तांनाच विघ्नात टाकले.
व्यावसायिक मूर्तिकार गणरायाच्या मूर्ती काही तासापूर्वी लाल मातीच्या असल्याचे ठामपणे सांगत होते. त्याच मूर्ती उघड्यावर पडल्यावर फुटल्या. त्यात प्लास्टर आॅफ पॅरिसचाच चुरा निघाला. यामुळे मूर्तिकारांनी गणेशभक्तांना फसविल्याचे उघड झाले.
(शहर वार्र्ताहर)