तुरीच्या ‘टोकन’साठीच धावाधाव

By Admin | Updated: March 8, 2017 00:15 IST2017-03-08T00:15:43+5:302017-03-08T00:15:43+5:30

येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीची प्रचंड आवक वाढल्याने बाजार समितीने टोकन देणेच बंद केले आहे.

Scroll for a token 'token' | तुरीच्या ‘टोकन’साठीच धावाधाव

तुरीच्या ‘टोकन’साठीच धावाधाव

नाफेडची खरेदी : पुसदच्या शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी चक्क ‘मे’च्या तारखा
पुसद : येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीची प्रचंड आवक वाढल्याने बाजार समितीने टोकन देणेच बंद केले आहे. परिणामी तूर विकण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची टोकनसाठी धावाधाव सुरू आहे. तर दुसरीकडे पुरेशा बारदान्याअभावी नाफेडची खरेदी संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तूर विकताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
येथील बाजार समितीच्या यार्डात नाफेडची तूर खरेदी सुरू आहे. नाफेड पाच हजार ५० रुपये हमीदराने प्रती क्विंटल खरेदी करीत आहे. तर दुसरीकडे व्यापारी ३८०० ते ४३०० रुपये भाव देत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी नाफेडच्या केंद्रांवर गर्दी करून आहेत. आवक अधीक आणि क्षमता कमी यामुळे बाजार समितीत तुरीच्या पोत्यांचे ढीग लागले आहेत. एका दिवशी केवळ ५०० क्विंटल खरेदी होत आहे. त्यामुळे बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी टोकन देणे सुरू केले. शेतकऱ्यांनी गत आठवड्यापर्यंत रांगा लावून टोकन घेतले. मे महिन्याच्या शेवटपर्यंतचे बुकिंग पूर्ण झाले आहे. सोमवारी आलेल्या शेतकऱ्यांना टोकन देणे बंद झाल्याचे सांगण्यात येत होते.
शेतकरी बाजार समितीत येऊन टोकनची मागणी करतात. त्यांना नोंदणी बंद झाल्याचे सांगितले जाते. वडसद येथील शेतकरी सतीश देशकर तूर विक्रीच्या टोकनसाठी आला होता. परंतु बाजार समितीचे मुख्य कार्यालय, यार्ड आणि नाफेडकडेही चौकशी करून त्याला टोकन मिळाले नाही. आता तूर जर विकली गेली नाही तर आम्ही काय करावे, असे तो म्हणाला. गौळ येथील ज्ञानेश्वर चव्हाण यांचीही अशीच अवस्था होती. काही शेतकरी तर राजकीय दबाव आणून टोकन मागण्याचा प्रयत्न करीत होते. तूर विक्रीसाठी वणवण भटकावे लागत असेल तर काय, असे शेतकरी सांगत होते.
येथील बाजार समितीच्या यार्डात एकीकडे नाफेडची खरेदी तर दुसरीकडे व्यापाऱ्यांचीही खरेदी सुरू होती. नाफेड खरेदी करताना प्रत्येक वेळी चाळणी लावून तूर खरेदी करीत होते. त्यामुळे तीन ते चार किलो तूर बाजुला काढली जात होती. तसेच नाफेड केवळ आपल्याच बारदान्यातून खरेदी करते. मध्यंतरी बारदान्याचा तुटवडा पडल्याने खरेदी बंद होती. २८ फेब्रुवारीचे टोकन असलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी ६ मार्च रोजी करण्यात आली. सोमवारी नाफेडकडे दोन हजार कट्टे बारदाना आला. परंतु तोही अपुरा पडणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना तूर विकण्यासाठी अडचण जात आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजार समितीच्या यार्डात सोमवारी आंदोलन केले. तसेच खरेदी वेगाने करावी या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय गडम यांच्या नेतृत्वात उपनिबंधक जी.एन. नाईक यांना निवेदन दिले आहे.
(कार्यालय चमू)

बाजार समितीच्या आवारात नाफेड व व्यापाऱ्यांची तूर खरेदी सुरू आहे. बाजार समितीचे १८ हमाल, तीन मापारी खरेदीच्या कामी लावले आहेत. बाजार समितीने सर्व सुविधा दिल्या असून, हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्याने तीन दिवसांपासून माल घेणे बंद केले आहे. शेतकऱ्यांसाठी बाजार समितीत मंडप टाकला असून, पाण्याचीही सुविधा करण्यात आली आहे. नाफेडकडे मोठी आवक वाढल्याने आता शेतकऱ्यांना जून महिन्याचे खरेदी टोकन दिले जात आहे.
- शिवाजीराव मगर,
सचिव, बाजार समिती.

Web Title: Scroll for a token 'token'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.