ग्रामीण प्रतिभेची वैज्ञानिक झेप राष्ट्रीयस्तरावर
By Admin | Updated: December 16, 2014 23:01 IST2014-12-16T23:01:45+5:302014-12-16T23:01:45+5:30
ग्रामीण प्रतिभेला आत्मविश्वासाचे पंख लाभले की, आकाश झेप घेतल्याशिवाय राहत नाही. घाटंजी सारख्या आदिवासी बहुल तालुक्यातील एका विद्यार्थिनीने तयार केलेल्या स्वयंचलित फवारणी यंत्राची

ग्रामीण प्रतिभेची वैज्ञानिक झेप राष्ट्रीयस्तरावर
विठ्ठल कांबळे - घाटंजी
ग्रामीण प्रतिभेला आत्मविश्वासाचे पंख लाभले की, आकाश झेप घेतल्याशिवाय राहत नाही. घाटंजी सारख्या आदिवासी बहुल तालुक्यातील एका विद्यार्थिनीने तयार केलेल्या स्वयंचलित फवारणी यंत्राची दखल राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रयोग राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात कौतुकाचा विषय ठरला.
अंजली संजय गोडे असे या बालवैज्ञानिकाचे नाव आहे. घाटंजीच्या शिक्षण प्रसारक मंडळ कन्या शाळेत ती दहाव्या वर्गात शिकते. तिच्यातील चिकित्सक आणि वैज्ञानिक जाणीवा विज्ञान शिक्षक अतुल ठाकरे यांनी शोधल्या. तिच्या प्रतिभेला भरारी देण्यासाठी त्यांनी बळ दिले. अंजली ही शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणारा प्रयोग करण्याचे ठरविले. त्यातूनच पुढे आला तो स्वयंचलित फवारणी यंत्र हा प्रयोग. तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तर अशा विविध फेऱ्या पार करीत हा प्रयोग पोहोचला राष्ट्रीय स्तरावर. चंदीगड येथे एनसीआरटीच्यावतीने नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या १९२ प्रयोगात अंजलीचाही प्रयोग होता. या प्रदर्शनात तिच्या प्रतिकृतीची निवड राष्ट्रीय अगस्त संस्था यांनी केला. ग्रामीण भागातील एका वैज्ञानिक जाणीवा असलेल्या तरुणीने मिळविलेले हे यश जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायीच आहे.
(तालुका प्रतिनिधी)