सामाजिक सुधारणांसाठी विज्ञान विकसित केले पाहिजे

By Admin | Updated: April 12, 2015 00:01 IST2015-04-12T00:01:35+5:302015-04-12T00:01:35+5:30

मंगळावर यशस्वीपणे यान पाठविण्याइतपत प्रगती भारताने केली आहे.

Science should be developed for social reform | सामाजिक सुधारणांसाठी विज्ञान विकसित केले पाहिजे

सामाजिक सुधारणांसाठी विज्ञान विकसित केले पाहिजे

बेजवाडा विल्सन : ‘समता पर्वात’ बहुजनांच्या हक्कावर मार्गदर्शन
काशीनाथ लाहोरे  यवतमाळ
मंगळावर यशस्वीपणे यान पाठविण्याइतपत प्रगती भारताने केली आहे. इतरही क्षेत्रात नेत्रदीपक प्रगतीचा आलेख वाढत आहे. असे असताना आजही जाती व्यवस्थेमुळे काही कामांसाठी विशिष्ठ वर्गालाच गृहीत धरले जाते. मानवी मलमूत्राची विल्हेवाट आजही माणसांकडून करून घेतली जाते. माणुसकीला काळिमा असणाऱ्या या कामाच्या पद्धतीत बदल करावा, असे प्रस्थापितांना वाटतच नाही. आत्मसन्मानाने जगण्याची संधी सर्वांना दिली पाहिजे. भारतीय घटनेने ती दिली असली तरी भारतातील अनेक कायदे हे केवळ कागदावरच आहे. सफाईचे काम कोणीही खुशीने करीत नाही, असे प्रतिपादन मानवी हक्क आंदोलन तथा सफाई कामगार आंदोलनाचे नेते बेजवाडा विल्सन (दिल्ली) यांनी केले.
महात्मा फुले-डॉ. आंबेडकर समता पर्वात राजर्षी शाहू महाराज समता परिसरात पहिल्या समता विचारवेध सत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अन्न व औषधी प्रशासन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चोथरीराम यादव (बनारस), नरेंद्र फुलझेले, ज्ञानेश्वर गोबरे, मायाताई गोबरे, मंगला दिघाडे, दीपक नगराळे, मधुकर भैसारे, मन्सूर एजाज जोश आदी विचारपीठावर उपस्थित होते.
प्रा. चोथरीराम यादव म्हणाले, हजारो वर्षांपासूनच्या सवर्णांच्या गुलामगिरीतून मुक्त होणे हा बहुजनांचा जन्मसिद्ध हक्क आहे. अघोषित आरक्षणाचा लाभ सवर्णांनी हजारो वर्षांपासून घेतला आहे. एकविसावे शतक हे फुले-आंबेडकरांचे शतक असून फुलेंच्या सत्यशोधक विचारधारेचा प्रवाह म्हणजे समता पर्व आहे.
डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, सफाई कामगारांसाठीचा कायदा बनविण्यात बेजवाडा विल्सन यांचा मोठा सहभाग आहे. अधिकाराच्या पदावर असल्याने मला त्यांचे काम पुढे रेटता आले एवढेच. यापुढे रेल्वेच्या डब्यांना जैविक शौचालय लावले जाणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
‘क्षण एक गौरवाचा’ या मालेत बेजवाडा यांचा सन्मान अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. चाथरीराम यांनाही सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी यवतमाळातील स्त्री-पुरुष सफाई कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मिलिंद भगत यांनी त्यांचा परिचय करून दिला. विनोद बुरबुरे यांनी संपादित केलेल्या ‘समता पर्व’ या साप्ताहिकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. समता पर्वाच्या वेबसाईटचेही लोकार्पण करण्यात आले. समता पर्व, स्मृतिपर्वाच्या धर्तीवर नवरात्रात युवापर्व घेण्याची संकल्पना यावेळी अध्यक्षांनी मांडली. संचालन अंकुश वाकडे यांनी केले.

Web Title: Science should be developed for social reform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.