शाळेला शौचालयाचे स्वरूप
By Admin | Updated: June 1, 2015 00:21 IST2015-06-01T00:21:51+5:302015-06-01T00:21:51+5:30
येथील एकतानगरमधील नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक २ व १० या शाळेत परिसरातील नागरिक शौचास बसत आहे.

शाळेला शौचालयाचे स्वरूप
विद्यार्थी धोक्यात : नगरपरिषदेने लक्ष देण्याची गरज
वणी : येथील एकतानगरमधील नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक २ व १० या शाळेत परिसरातील नागरिक शौचास बसत आहे. त्यामुळे या शाळांना आता शौचालयाचे स्वरूप प्राप्त झाले असून विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत नगरपरिषदेने शाळा क्रमांक २ व १० मध्ये वर्गखोल्यांची निर्मिती केली. तेथे काही खोल्या बांधण्यात आल्या. आता शाळांना उन्हाळी सुट्या आहेत. त्यामुळे वर्गखोल्या नेहमी बंद असतात. नेमका याच संधीचा लाभ घेत परिसरातील नागरिक आता या वर्गखोल्या परिसरात शौचास जात आहे. परिसरातील नागरिक चक्क शाळेत शौचाला जात असल्याने या दोन्ही शाळांना आता शौचालयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शाळेला सुट्या असल्यामुळे नगरपरिषदेचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळी सुट्यांशिवाय इतरही अनेक दिवशी नागरिक तेथे शौचास बसतात. ही समस्या गेल्या पाच वर्षांपासून कायम आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने वर्गखोल्यांवर सूचना फलक लावला. त्यात शाळेच्या प्रांगणात कोणीही शौचास बसू नये, शौचास बसलेले आढळल्यास गुन्हा दाखल करून पोलिसांच्या हवाली करण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली आहे. मात्र या ताकीदला कुणीही भीक घालताना दिसत नाही.
शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
शिक्षक व विद्यार्थ्यांना घाणीचा प्रचंड त्रास होतो. गेल्या पाच वर्षांपासून ते हा त्रास सहन करीत आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्यच आता धोक्यात सापडले आहे. त्यांना विविध आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या गंभीर समस्येकडे नगरपरिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे अनेकदा या शाळेसमोर नगरपरिषदेचे काही पदाधिकारी, नगसेवक ठिय्या मांडून बसतात. मात्र त्यांना ही समस्या दिसत नाही. कदाचित समस्या माहितही असेल, मात्र ते त्याकडे दुर्लक्ष करतात. (स्थानिक प्रतिनिधी)
शौचालय बांधकामास प्रचंड विलंब
या शाळेला गेल्या नऊ महिन्यांपूर्वी सुलभ शौचालय मंजूर झाले. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र आता बांधकामास विलंब होत आहे. हे शौचालय बांधकाम कधी पूर्णत्वास जाईल, याची कोणतीही शाश्वती नाही. आता नागरिकांनी वर्गखोल्यांनाच शौचालय बनविले आहे. शाळेचे शौचालय पूर्ण झाल्यास त्याचाही वापर परिसरातील नागरिकच करण्याची जादा शक्यता आहे.