आईसाठी दत्ताशिवाने सोडली शाळा
By Admin | Updated: November 18, 2016 02:39 IST2016-11-18T02:39:24+5:302016-11-18T02:39:24+5:30
अपंग आणि वेडसर असल्याने तिचे लग्न म्हाताऱ्याशी लावून देण्यात आले. तो मरण पावल्यावर माहेरच्यांनीही थारा दिला नाही.

आईसाठी दत्ताशिवाने सोडली शाळा
सुन्न करणारी कहाणी : पती गेला, माहेर सुटले, उघड्या निवाऱ्यात मुलगाच आधार
अविनाश खंदारे उमरखेड
अपंग आणि वेडसर असल्याने तिचे लग्न म्हाताऱ्याशी लावून देण्यात आले. तो मरण पावल्यावर माहेरच्यांनीही थारा दिला नाही. बाजार ओट्याजवळ निराधार जगणाऱ्या या आईसाठी शेवटी तिचा छोटासा मुलगाच आई बनला. आईची काळजी घेण्यासाठी सातवीतल्या दत्ताशिवा या मुलाने शाळाही सोडली. ‘माझ्या आईची राहण्याची व्यवस्था करा. मला खूप शिकायचे आहे’, ही दत्ताशिवाची आर्त हाक आहे.
डाव्या हाताने अपंग असलेली ही काहिशी वेडसर आई मुळची पुसद तालुक्यातील लोणदरीची रहिवासी. तिच्या ढासळलेल्या मनस्थितीमुळे घरच्यांनी तिचे लग्न चोंढी गावातील एका म्हाताऱ्याशी लावून दिले. पदरात दत्ताशिवा हे बाळ टाकून तो म्हाताराही देवाघरी गेला. ती लेकरू घेऊन माहेरी आली. पण तेथे तिला सतत मारहाण सुरू झाली. शेवटी तिने माहेरही सोडले. ती मुळावा गावात आली. काही दिवस बसस्थानक परिसरात भिक मागून जगत राहिली. परंतु, पावसाळा लागताच निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला. अखेर तिने आठवडी बाजारातील टीनशेडचा आधार घेतला. पण मंगळवारी बाजाराच्या दिवशी हा आधारही मिळत नव्हता. आईसोबत लहानगा दत्ताशिवा हाल भोगत कसाबसा जगतो.
आठ वर्षांचा दत्ताशिवा लोणदरीला आजोबाकडे राहून शाळेत जाऊ लागला. आता आई कुठे गेली असेल याची त्याला कल्पना नव्हती. आईसाठी तो व्याकूळ होता. त्याला कोणीच काही सांगत नव्हते. अन् अचानक एक दिवस आई लोणदरीत पोहोचली.
दत्ताशिवाचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण तेवढ्यात आजोबाने दारुच्या नशेत पुन्हा आईला हाकलून दिले. आता पुन्हा ताटातूट होणार हे लक्षात आल्याबरोबर दत्ताशिवानेही आईसोबत बाहेरची वाट धरली. जंगल तुडवित ते मुळाव्यात पोहोचले. आईसाठी दत्ताशिवाने शाळा सोडली. आजोबाचे सुरक्षित घर सोडले. आता तो दिवसभर भिक मागून दोघांचाही उदरनिर्वाह करू लागला. या जगात आईला वृद्धाश्रमात पाठविणारे कमी नाहीत. पण दत्ताशिवाने आईसाठी सुरक्षित निवारा सोडून भटके जीवन पत्करले.
डोळ्याला लागल्या अश्रूच्या धारा
दत्ताशिवाच्या वेडसर आईचा समाजातील कुप्रवृत्तीने गैरफायदा घेतला. काही दिवसांपूर्वीच उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात तिची प्रसूती झाली. आता या माय-लेकरांची जबाबदारी घेण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. ही स्थिती पाहून आठ वर्षांचा दत्ताशिवाय धायमोकलून रडला. आईच्या राहण्याची व्यवस्था करा. मला शिकायचे आहे, एवढाच त्याचा टाहो आहे.